नागपूर : झुम्बा डान्स,योग प्रशिक्षण, मलखांबावर थरारक प्रात्यक्षिक, देशभक्ती गीतांची मैफिल आणि शेवटी फुटाळा तलावातील जागतिक दर्जाच्या ‘फाऊटंन शो ‘च्या मेजवानीत नागपूरकर तरुणाईने हजारोच्या संख्येने उपस्थित राहत नवमतदार नोंदणी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शनिवारी सायंकाळी नागपुरातील तरुणाईला फुटाळा तलावावर उपस्थित राहण्याची साद जिल्हा प्रशासनाने घातली होती. मतदान नोंदणी सोबत ‘इलेक्शन युथ फेस्टीवल’चे आयोजन दुपारी ४ ते सायंकाळी ७ या वेळेत करण्यात आले होते.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्या अंतर्गत ऑक्टोबर 2023 पर्यंत ज्या मतदारांची वयाची 18 वर्षे पूर्ण होतात, त्या सर्वांनाही या ठिकाणी नोंदणीसाठी अर्ज देण्यात आले. अनेकांची नोंदणी करण्यात आली. त्यामुळे ही मुले 18 वर्षाची पूर्ण झाल्यानंतर आपोआपच त्यांची नावे मतदार यादीमध्ये येणार आहे. त्यामुळे या ‘इलेक्शन युथ फेस्टिवलला ‘ १७ वर्षाच्या वरती असणाऱ्या मुलांनाही आमंत्रित करण्यात आले होते. त्यामुळे ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची देखील मोठ्या संख्येने उपस्थिती होती. नवमतदारांनी उत्साहात नोंदणी केली.
नागपूर महानगरपालिका,नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ,खलतकर कन्स्ट्रक्शन, महानगरातील सर्व शाळा त्यांचे, शिक्षक, प्राचार्य व जिल्हा प्रशासन यांच्या मदतीतून हा भव्य ‘इलेक्शन युथ फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, निवडणूक उपजिल्हाधिकारी मीनल कळसकर, यांच्यासह जिल्हा प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांच्या मार्गदर्शनात साहसी क्रीडा प्रकारांचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांनी यावेळी झुम्बा डान्स, योग प्रशिक्षण व मलखांबाच्या चित्त थरारक प्रात्यक्षिकाला टाळ्यांच्या प्रतिसादात साद घातली. देशभक्तीपर गाण्यांवर स्टेडियमवर उपस्थित हजारो मुलांनी थिरकत आनंद घेतला. नागपूरकर तरुणाईसाठी फुटाळा म्युझिकल फाऊंटन शोचे निशुल्क आयोजनही करण्यात आले होते. जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी यावेळी तरुणाईशी संवाद साधला. मोठ्या संख्येने उपस्थित झाल्याबद्दल त्यांनी युवकांना धन्यवाद दिले. तत्पूर्वी उपजिल्हाधिकारी मीनल कळसकर, तहसिलदार राहुल सारंग यांनी निवडणूक आयोगाच्या इतिहासासोबतच, निवडणुकीच्या मतदार यादी बाबतच्या, मतदान सहभागाच्या अनेक महत्वपूर्ण बाबी सांगितल्या. मतदान यंत्रणे संदर्भात व मतदान यादी संदर्भातील महत्त्वपूर्ण साहित्याचे वाटपही या ठिकाणी करण्यात आले.