‘खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सव’ १९ जानेवारीपासून

– सुप्रसिद्ध गायक महेश काळे, कोकण कन्या बँड, अभिनेते शेखर सेन यांचे सादरीकरण

– तीन दिवस कवीवर्य सुरेश भट सभागृहात मेजवानी; दररोज कर्तृत्ववान ज्येष्ठांचा सत्कार

नागपूर :- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानच्या वतीने येत्या १९ जानेवारीपासून ‘खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. २१ जानेवारीपर्यंत रेशीमबाग येथील कवीवर्य सुरेश भट सभागृहात हा महोत्सव होणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांनी आज (शुक्रवार) पत्रकार परिषदेत दिली.

तीन दिवसांच्या या महोत्सवात दररोज पाच कर्तृत्ववान ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार होणार आहे. समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल त्यांना गौरविण्यात येणार आहे. १९ जानेवारीला (शुक्रवार) सायंकाळी ५.३० वाजता केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल. यावेळी ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सवाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते दत्ता मेघे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. उद्घाटन सोहळ्यानंतर लगेच सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळे यांचा भावगीतांचा कार्यक्रम होणार आहे. २० जानेवारीला (शनिवार) कोकण कन्या बॅण्डचा ‘लाईव्ह कॉन्सर्ट’ आणि २१ जानेवारीला (रविवार) आंतरराष्ट्रीय लेखक-दिग्दर्शक-अभिनेते शेखर सेन यांचा ‘तुलसी’ हा एकपात्री नाट्याविष्कार सादर होईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

दत्ता मेघे यांच्या खामला येथे निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेला प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रा. अनिल सोले, सचिव डॉ. राजू मिश्रा, कोषाध्यक्ष अशोक मानकर, विश्वस्त प्रभाकर येवले, प्रतापसिंह चव्हाण, गोपाल बोहरे, नारायण समर्थ, बाळ कुळकर्णी, अविनाश घुशे, डॉ. संजय उगेमुगे, गौरी चांद्रायण आणि महमूद अंसारी यांची उपस्थिती होती. खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सवाचे यंदा दुसरे वर्ष असून गेल्यावर्षी ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, सुप्रसिद्ध अभिनेत्री वंदना गुप्ते, सुप्रसिद्ध गायक नितीन मुकेश, गायक-संगीतकार शिवा चौधरी यांची उपस्थिती होती.

तीन दिवस मेजवानी

*१९ जानेवारी (शुक्रवार) * : सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळे यांचा भावगीतांचा कार्यक्रम.

*२० जानेवारी (शनिवार) * : कोकण कन्या बॅण्डचा ‘लाईव्ह कॉन्सर्ट’. जुनी हिंदी-मराठी गाणी नवीन पद्धतीने सादर केली जातील.

*२१ जानेवारी (रविवार) * : आंतरराष्ट्रीय अभिनेते शेखर सेन यांचा ‘तुलसी’ हा एकपात्री नाट्याविष्कार.

निःशुल्क प्रवेशिका

तीन दिवसांच्या महोत्सवासाठी निःशुल्क प्रवेशिका उपलब्ध असून त्यासाठी केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांच्या खामला चौकातील जनसंपर्क कार्यालयात सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत प्रत्यक्ष संपर्क साधायचा आहे. सभागृहात प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर आसन व्यवस्था असणार आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.

ज्येष्ठ नागरिकांना आवाहन

१९ जानेवारी पासून तीन दिवस रंगणारा खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सव विशेषत: ज्येष्ठ नागरिकांकरिता आयोजित करण्यात आल्याने अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रा. अनिल सोले, सचिव डॉ. राजू मिश्रा, कोषाध्यक्ष अशोक मानकर यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी केले.

ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी

ज्येष्ठ नागरिकांचे उत्तरार्धातील आयुष्य सुखात, समाधानात जावे यादृष्टीने तसेच त्यांच्या आरोग्याच्या तक्रारी सोडविण्याच्या दृष्टीने ना. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून सहा वर्षांपूर्वी ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली. आतापर्यंत १७२ ज्येष्ठ नागरिक मंडळे प्रतिष्ठानसोबत संलग्न झाली असून जवळपास १८ हजार ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रतिष्ठान पोहोचले आहे. ज्येष्ठांसाठी १२२ आरोग्य शिबिरे देखील आयोजित करण्यात आली असून कर्ण व नेत्र तपासणी अभियान नियमित सुरू आहे. पूर्णब्रह्म अभियान अंतर्गत गरजूंना निःशुल्क अन्नधान्य आणि ईतर गरजेच्या वस्तू वितरण, आरोग्यसेवा, सांस्कृतिक कार्यक्रम , मोफत तीर्थपर्यटन अश्या विविध क्षेत्रांमध्ये प्रतिष्ठान कार्यरत आहे. प्रतिष्ठानच्या सर्व सेवा आणि उपक्रम ज्येष्ठांकरिता निःशुल्क राबविले जातात हे विशेष, अशी माहिती दत्ता मेघे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जाणता राजा महानाट्याचा आज प्रयोग, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ

Sat Jan 13 , 2024
*यशवंत स्टेडियम सज्ज* *नागपुरच्या ७० कलाकारांचा समावेश* *शहरात महानाट्याचा ६वा प्रयोग*  नागपूर :- स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा उलगडणाऱ्या ‘जाणता राजा’ या ऐतिहासिक महानाट्याच्या राज्यभर आयोजित होणाऱ्या उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत उद्या दि.१३ जाऐवरी रोजी सायंकाळी ५.३० […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com