विशेष लेख – मतदानाची टक्केवारी अंतिम करण्याची प्रक्रिया पारदर्शक

भारत निवडणूक आयोगाने झालेल्या मतदानाची टक्केवारी सर्वांना कळावी म्हणून वोटर टर्नआऊट ॲप (Voter Turnout App) तयार केलेले आहे. हे ॲप गुगल प्ले स्टोर (Google Play Store) व ॲपल स्टोर (Apple Store) वर अथवा आयोगाच्या वेबसाईटवर सहज उपलब्ध आहे आणि कोणीही डाऊनलोड करुन त्याचा उपयोग करु शकतो. यावर मतदानाच्या दिवशी सकाळी 9 नंतर दर दोन तासांनी झालेल्या मतदानाची अंदाजित टक्केवारी जाहीर करण्यात येते. मतदानाची प्रत्यक्ष टक्केवारी आणि ॲपवर दिसत असलेली टक्केवारी यामध्ये थोडाफार फरक पडू शकतो, हे स्वाभाविक आहे. या ॲपवर राज्य, लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ यातील अंदाजित टक्केवारी उपलब्ध होते. हे ॲप डाऊनलोड करुन वापरण्याची लिंक सोबत जोडली आहे.

https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.eci.pollturnout&hl=en_IN

https://apps.apple.com/in/app/voter-turnout-app/id1536366882

दर दोन तासांप्रमाणे मतदानाच्या दिवशी सायंकाळी 5 वाजताची अंदाजित टक्केवारी बघता येते. काही मतदान केंद्रावर संध्याकाळी 6 वाजण्याच्या आत म्हणजे मतदानाची वेळ संपण्याच्या आत मतदान केंद्रांवर दाखल झालेल्या मतदारांना टोकन देऊन सर्वांचे मतदान पूर्ण होईपर्यंत मतदान चालू राहते. काही मतदान केंद्रांवर अगदी रात्री 9 वाजेपर्यंत मतदान चालू असण्याची उदाहरणे आहेत.

मतदान संपल्यानंतर सर्व मतदान पथके विधानसभेच्या मुख्यालय असलेल्या ठिकाणी येवून मतदान यंत्रे, केंद्राध्यक्षांची डायरी व इतर कागदपत्रे सादर करतात. काही मतदान केंद्रे दुर्गम भागात तसेच विधानसभा मुख्यालयापासून दूर असल्यामुळे तेथील मतदान पथकांना मुख्यालयी पोहोचण्यास उशीर होतो किंवा कधी कधी पाऊस अथवा वाहतुकीचा अडथळा यामुळे देखिल उशिर होवू शकतो. पूर्णपणे पोलीस बंदोबस्तामध्ये विधानसभा मुख्यालयात पोहोचल्यानंतर सर्व मतदान यंत्रे सुरक्षितरित्या क्रमवार एकत्र लावून लोकसभा मतदार संघाच्या मुख्यालय किंवा जिल्हा मुख्यालयामध्ये येण्यासाठी कडक पोलीस बंदोबस्त आणि व्हिडिओच्या निगराणीमध्ये सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार यांना सूचित केल्यानंतरच मतदान यंत्राचा प्रवास चालू होतो. अनेक ठिकाणी मतदान यंत्रे आणि संबंधित कागदपत्रे मतमोजणी केंद्राच्या शेजारी असलेल्या स्ट्राँगरुममध्ये पोहोचायला दुसऱ्या दिवशी सकाळ किंवा अगदी दुपार होते. दरम्यानच्या काळात दूरध्वनी संदेशानुसार घेतलेल्या माहितीच्या अनुषंगाने मतदानाच्या दिवशी मध्यरात्रीपर्यंत पुन्हा एकदा अंदाजित टक्केवारी निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी Encore ह्या भारत निवडणूक आयोगाच्या सॉफ्टवेअरद्वारे वोटर टर्नआऊट ॲप (Voter Turnout App) वर जाहीर करतात. ही जाहीर करण्यात आलेली टक्केवारी “Close of Poll” म्हणजे मतदान संपल्यानंतरची अंदाजित टक्केवारी असते.

केंद्राध्यक्षांची डायरी आणि इतर कागदपत्रांवरुन खात्री करुन जाहीर करण्याची टक्केवारी मतदानाच्या दुसऱ्या दिवशी रात्रीपर्यंत तयार होते आणि लगेचच निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून भारत निवडणूक आयोगाच्या Encore या सॉफ्टवेअरवर भरण्यात येते आणि तीच टक्केवारी वोटर टर्नआऊट ॲप (Voter Turnout App) वर प्रसिध्द करण्यात येते. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी संपूर्ण आकडेवारीची माहिती घेऊन खात्री केल्यावरच त्यावर शिक्कामोर्तब होवून मतदानाची अंतिम टक्केवारी वोटर टर्नआऊट ॲप (Voter Turnout App) वर प्रसारित होते. त्याला “end of poll” अंदाजित टक्केवारी म्हणतात. यासाठी “मतदानाच्या दिवसाच्या दुसऱ्या दिवशी रात्री” ही समय मर्यादा ठरवून देण्यात आलेली आहे.

वोटर टर्नआऊट ॲप (Voter Turnout App) वर मतदानाची अंतिम टक्केवारी सर्व मतदान केंद्रावरील माहिती एकत्र होऊन मतदानाच्या दुसऱ्या दिवशी मध्यरात्री जाहीर होते. ही सर्व टक्केवारी अंदाजित असते. याचे कारण उघड आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर जेव्हा मतदान संपते तेव्हा त्या मतदान केंद्रात झालेल्या मतदानाची संख्या आणि टक्केवारी प्रत्येक मतदान केंद्रात उपस्थित असलेल्या राजकीय पक्ष अथवा उमेदवारांच्या प्रतिनिधींकडे केंद्राध्यक्षांच्या स्वाक्षरीनिशी सूपुर्द केलेली असते. प्रत्येक मतदान केंद्रावरील ही संख्या आणि टक्केवारी हा संपूर्ण आकडेवारीचा मूळ आधार असतो. महाराष्ट्र राज्यामध्ये यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी एकूण मतदान केंद्रांची संख्या 98,000 च्या आसपास होती. यावरुन ही आकडेवारी तयार करण्याचे काम किती मोठे आहे याची कल्पना करता येते.

एखादया राजकीय पक्षाने नियुक्ती केलेल्या सर्व मतदान केंद्रांवरच्या प्रतिनिधींकडून केंद्राध्यक्षांच्या स्वाक्षरीनिशी प्राप्त झालेल्या मतदानाची संख्या आणि टक्केवारी याची तुलना केल्यास मतदानाच्या दुसऱ्या दिवशी मध्यरात्री जाहीर झालेल्या टक्केवारीशी निश्चितपणे जुळेल. तरी देखिल वोटर टर्नआऊट ॲप (Voter Turnout App) मध्ये अंतिम टक्केवारीला Approximate असेच म्हटले आहे. त्याचे कारण असे की ही अंतिम टक्केवारी केंद्राध्यक्षांच्या डायरीशी आणि राजकीय अथवा उमेदवारांच्या मतदान केंद्रातील उपस्थित प्रतिनिधींकडे दिलेल्या संख्येशी जुळत असली तरी मतमोजणीच्या दिवशी त्यामध्ये पोस्टल बॅलेट (डाक मतपत्रिका) द्वारे झालेल्या मतदानाची संख्या समाविष्ट केली जाते. त्यामुळे मतदानाची संख्या आणि एकूण टक्केवारी यांच्यात मतमोजणीच्या दिवशी किंचीतशी वाढ दिसून येते. वोटर टर्नआऊट ॲप (Voter Turnout App) वर मतदानाच्या दिवशीच्या दुसऱ्या दिवशी मध्यरात्री दिसणारी अंतिम टक्केवारी ही मतदान यंत्रावरील मतदानाची टक्केवारी असते. त्यामध्ये Election Duty Certificate (EDC) मतदारांनी मतदान यंत्रात केलेल्या मतदानाची संख्या समाविष्ट असते. त्याबाबतची नोंद संबंधित केंद्राध्यक्षांने डायरीत घेवून त्याची माहिती मतदान केंद्रातील प्रतिनिधींना दिलेली असते.

ही सर्व रचना लक्षात घेतल्यास या रचनेमध्ये बारकाईने विचार करुन त्याचे काटेकोर असे कार्यवाहीचे टप्पे भारत निवडणूक आयोगाने गेल्या लोकसभा निवडणूकीपासूनच निश्चित केलेले आहेत. ही पध्दत आता चांगली प्रस्थापित झालेली असून पारदर्शकतेचे उत्तम उदाहरण आहे.

मतदानाच्या टक्केवारीत होणारे बदल याबाबत चर्चा करताना सर्वांनी ही प्रक्रिया नीट समजावून घेणे आवश्यक आहे. अन्यथा गैरसमज अथवा अफवा पसरु शकते आणि उपयुक्त तंत्रज्ञानाची सुविधा आपल्या सगळयांच्या हाती असूनही तिचा सुयोग्य उपयोग होत नाही, अशी परिस्थिती होऊ शकते.

– डॉ.किरण कुलकर्णी,

अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी,महाराष्ट्र राज्य

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज असावे - डॅा.पंकज आशिया

Fri May 17 , 2024
– मान्सुन पुर्व तयारी आढावा बैठक यवतमाळ :- मान्सुन काळात विविध प्रकारचे आपत्तीजनक प्रसंग घडण्याची शक्यता असते. असे प्रसंग ओढवल्यास त्याचा सामना करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी सज्ज असले पाहिजे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांनी दिले. महसूल भवन येथे जिल्हाधिकाऱ्यांनी मान्सून पुर्व तयारीचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी सदर निर्देश दिले. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत, उपविभागीय अधिकारी तथा एकात्मिक आदीवासी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!