विशेष लेख : महाराष्ट्राबाहेर पुन्हा एकदा अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचा डंका!

यावर्षी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन राजधानी नवी दिल्ली येथे होत आहे. या आधी तब्बल बावीस वेळा महाराष्ट्राबाहेर साहित्य संमेलने झाली आहेत. यंदाही हे संमेलन अनेक कारणांसाठी विशेष ठरणार आहे.

केंद्र सरकारकडून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारे हे पहिले साहित्य संमेलन आहे. यामुळे हे संमेलन ऐतिहासिक असेल. हा सोहळा मराठी भाषिक, साहित्यप्रेमींसाठी एक अभिमानास्पद क्षण ठरणार आहे. यामुळे संपूर्ण भारतभर आणि परदेशात विखुरलेल्या मराठी जनामनास एकत्र येण्याची संधी मिळणार आहे. या संमेलनामुळे मराठीचा लौकिक अधिक वृद्धिंगत होईल. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणारे उद्घाटन हा मराठी भाषिकांसाठी अभिमानाचा क्षण असेल.

अशी आहे मराठी साहित्य संमेलनाची गौरवशाली परंपरा

मराठी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ १८७८ मध्ये पुण्यात रोवली गेली. त्यानंतर महाराष्ट्राबाहेर मराठी साहित्याच्या प्रचार-प्रसारासाठी अनेक संमेलने महाराष्ट्राबाहेर पार पडली आहेत. विशेष म्हणजे १८७८ मध्ये सुरू झालेली साहित्य संमेलनाची परंपरा आजही सुरू आहे. पहिले संमेलन १८७८ मध्ये पुणे येथे पार पडले.

✒️ यानंतर १९०९ मध्ये म्हणजेच तब्बल २१ वर्षांनी सातवे संमेलन बडोदा (गुजरात) येथे पार पडले.

✒️ १९१७ मध्ये म्हणजेच तब्बल आठ वर्षांनी दहावे संमेलन मध्यप्रदेश मधील इंदूर येथे पार पडले.

✒️ १९२१ मध्ये तब्बल चार वर्षांनी अकरावे संमेलन बडोदा (गुजरात ) येथे पार पडले.

✒️ १९२८ मध्ये तब्बल सात वर्षांनी चौदावे संमेलन मध्यप्रदेशमधील ग्वाल्हेर येथे पार पडले.

✒️ १९२९ मध्ये पंधरावे संमेलन कर्नाटकमधील बेळगाव येथे पार पडले.

✒️ १९३० मध्ये सोळावे संमेलन गोव्यातील मडगाव येथे पार पडले.

✒️ १९३१ मध्ये सतरावे संमेलन तेलंगणातील हैद्राबाद येथे पार पडले.

✒️ १९३४ मध्ये तब्बल चार वर्षांनी विसावे संमेलन बडोदा (गुजरात) येथे पार पडले.

✒️ १९३५ मध्ये एकविसावे संमेलन मध्यप्रदेशमधील इंदूर येथे पार पडले.

✒️ १९४६ मध्ये तब्बल अकरा वर्षांनी ३० वे संमेलन कर्नाटकमधील बेळगाव येथे पार पडले.

✒️ १९४७ मध्ये ३१ वे संमेलन तेलंगणातील हैद्राबाद येथे पार पडले.

✒️ १९५१ मध्ये तब्बल चार वर्षांनी ३४ वे संमेलन कर्नाटक मधील कारवार येथे पार पडले.

✒️ १९५३ मध्ये ३६ वे संमेलन गुजरातमधील अहमदाबाद येथे पार पडले.

✒️ १९५४ मध्ये ३७ वे संमेलन दिल्ली येथे पार पडले.

✒️ १९६१ मध्ये ४३ वे संमेलन तब्बल सात वर्षांनी मध्यप्रदेशमधील ग्वालेहर येथे पार पडले.

✒️ १९६४ मध्ये ४५ वे संमेलन गोव्यातील मडगाव येथे पार पडले.

✒️ १९६७ मध्ये ४७ वे संमेलन मध्यप्रदेशमधील भोपाळ येथे पार पडले.

✒️ १९८१ मध्ये तब्बल १४ वर्षांनी ५६ वे संमेलन छत्तीसगडमधील रायपूर येथे पार पडले.

✒️ २००० मध्ये ७३ वे संमेलन तब्बल १९ वर्षांनी कर्नाटक मधील बेळगाव येथे पार पडले.

✒️ २००१ मध्ये ७४ वे संमेलन मध्यप्रदेशमधील इंदोर येथे पार पडले.

✒️ २०१५ मध्ये तब्बल १४ वर्षांनी ८८ वे संमेलन पंजाबमधील घुमान येथे पार पडले. त्यानंतर २०१८

✒️ २०१८ मध्ये ९१ वे संमेलन गुजरात मधील बडोदा येथे पार पडले.

यानंतर यंदा तब्बल ७ वर्षांनी पुन्हा २०२५ मध्ये ९८ वे संमेलन महाराष्ट्राबाहेर दिल्ली येथे पार पडणार आहे.

मराठी भाषा, संस्कृती आणि साहित्याचा जागर

मराठी ही केवळ एक भाषा नसून शब्द, साहित्य, संगीत, कला आणि संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे. संत साहित्यापासून ते आधुनिक काव्यापर्यंत, लोककथांपासून आधुनिक कादंबऱ्यांपर्यंत, नाटकांपासून चित्रपटांपर्यंत मराठी साहित्याचा वारसा अत्यंत समृद्ध आहे.

या संमेलनात मराठी साहित्यविश्वातील मान्यवर लेखक, कवी, समीक्षक आणि रसिक वाचक एकत्र येणार आहेत. विविध चर्चासत्रे, परिसंवाद, ग्रंथप्रदर्शने आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांमधून मराठी भाषेचे भवितव्य उजळवण्याचा संकल्प केला जाणार आहे.

या भव्य सोहळ्याचा भाग बना!

दिल्लीतील हे साहित्य संमेलन मराठी संस्कृतीचा उत्सव आहे. साहित्यप्रेमी, लेखक, कवी, विद्यार्थी आणि मराठी भाषा जपणाऱ्या सर्वांनी या ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार होण्याची ही सुवर्णसंधी आहे. आपली मराठी संस्कृती जपण्यासाठी, तिचा जागर करण्यासाठी आणि नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी आपण सर्वांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे. चला, तर मग मराठी साहित्याचा हा ऐतिहासिक उत्सव दिल्लीच्या ऐतिहासिक भूमीवर भव्य स्वरूपात साजरा करूया!

– वर्षा फडके- आंधळे, वरिष्ठ सहायक संचालक (माहिती)

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून श्री क्षेत्र आदासा येथे २ मार्चला सामूहिक अथर्वशीर्ष पठण

Tue Feb 18 , 2025
नागपूर :- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून रविवार दि. २ मार्च २०२५ रोजी श्रीक्षेत्र आदासा येथे सामूहिक श्री गणपती अथर्वशीर्ष पठण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. रविवार दि. २ मार्चला सकाळी ७.१५ वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे. भाविकांनी सकाळी ७ पर्यंत कार्यक्रमस्थळी पोहोचणे अपेक्षित आहे. यावेळी ना. नितीन गडकरी स्वतः सहकुटुंब उपस्थित राहणार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!