साहित्य संमेलन हे सांस्कृतिक मूल्यांचे आदान प्रदान करणारे एक महत्वाचे माध्यम होय. यात साहित्य सर्जनाचे, साहित्याच्या स्थितीगतीचे, समाजमनाचे तळसंदर्भ शोधण्याचे, वाचकांचे अंतर्मन जाणण्याचे, परिवर्तनाच्या लेण्यांना झळाळी देण्याचे, व्यवहारभाषेचे उपयोजन अन् त्यासंबंधीचे प्रयास जाणण्याचे हे केंद्र असते. मराठी भाषेचा हा महोत्सव ऊर्जादायी व्हावा याकरिता आयोजक संस्था जिवापाड प्रयत्न करतात. सध्या दिल्ली येथे साहित्य संमेलन होत आहे. ऐतिहासिक लाल किल्ला, लोकप्रतिनिधींच्या द्वारे जिथे संविधानाचा उद्घोष होतो ती संसद, जेएनयू अशी ही सत्ता आणि ज्ञानकेंद्र असलेल्या भूमीत हे संमेलन होत आहे.
एका अर्थाने संविधानातील स्वातंत्र्य समता बंधूतेचा शब्दाशय येथे व्यक्त होणार आहे. अखिल भारतीय संमेलन मराठी भाषिक राज्य असलेल्या महाराष्ट्राच्या बाहेर दिल्लीला होत असल्याने राजकीय सुव्यवस्था तसेच भव्यदिव्यता असणार हे ओघानेच आले. लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ.तारा भवाळकर या संमेलनाच्या अध्यक्षा आहेत. त्यांच्या एकूणच भूमिकेला साजेल अशी रोकठोक भूमिका त्यांनी अध्यक्षीय भाषणातून मांडली. मराठी साहित्याच्या अनुषंगाने व्यक्त झालेल्या बुलंद आवाजाची नोंद देशभर झाली, असे म्हणावे लागेल.
यवतमाळ येथे २०१९ मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते. या साहित्य संमेलनाच्या आठवणी अजूनही जाग्या आहेत. यवतमाळ येथे दि.११,१२,१३ जानेवारी २०१९ ला अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. वि.भि.कोलते संशोधन केंद्र व वाचनालय आणि विदर्भ साहित्य संघ यवतमाळ हे संमेलनाचे आयोजक होते. संत साहित्याचे अभ्यासक आणि गांधी विचारांचा प्रभाव असलेले डॉ.रमाकांत कोलते यांच्या संयमी कुशल नेतृत्वात या संमेलनाला लाभल्याने अनेक प्रवाहातील प्रतिभांना येथे वाव मिळाला. कोलते सरांचा समन्वयवादी स्वभाव, चौफेर असलेला त्यांचा चाहता विद्यार्थी वर्ग त्यामुळे हे संमेलन पार पडले. संमेलनाच्या अध्यक्ष अरुणा ढेरे यांनी अध्यक्षीय भाषणात धर्माच्या नावानं धुमाकूळ घालणाऱ्यांना ओळखले पाहिजे, तसेच संयोजकांनी झुंडशाहीपुढे झुकणं अशोभनीय असेही त्यांनी स्पष्ट केले. मराठीची दारं सर्वांसाठी खुली आहेत. समकालाला आवश्यक असे विचार डॉ.अरुणा ढेरे यांनी त्यावेळी व्यक्त केले.
मेलनात प्रचंड गर्दि होती. सर्व कार्यक्रम परिसंवाद छान झाले. विशेषतः बोलीतील कविसंमेलन विशेष गाजले. त्यात मिर्झा रफी अहमद बेग, मीराताई ठाकरे, नितीन देशमुख, जयंत चावरे, विजय ढाले यांच्या कवितांनी रसिकांना जिंकले. त्यांच्या कविता हसवता हसवता अंतर्मुख करणाऱ्या होत्या. संमेलन काय असतं हे यवतमाळकर पहिल्यांदा अनुभवत होते. त्यामुळे परिसरातील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थांनी चांगला प्रतिसाद दिला. पुस्तक दालनात मोठी गर्दि होती. पुस्तक विक्रीही मोठ्या प्रमाणात झाली.
आम्ही पदव्युत्तर मराठी विभागात शिकत असतांना डॉ.कोलते सर यवतमाळ येथे १९७३ मध्ये भरलेल्या ४९ साहित्य संमेलनाच्या आठवणी सांगत. ग.दि.माडगुळकर अध्यक्ष असलेल्या या संमेलनाचे स्वागताध्यक्ष तत्कालीन जिल्हापरिषद अध्यक्ष सुधाकरराव नाईक होते. उद्घाटन तत्कालीन केंद्रिय मंत्री यशवंतराव चव्हाण यांनी केले होते.
यवतमाळच्या भूमीतील अखिल भारतीय स्तरावरील ही दोन साहित्य संमेलने ज्येष्ठांच्या आठवणीत आहेत. याशिवाय यवतमाळात साहित्याच्या नव्या प्रवाहाची संमेलने संपन्न झाली. यवतमाळची माणसे साहित्यावर प्रेम करणारी आहेत. मराठीला अभिजात भाषा म्हणून मान्यता मिळाली हे खरे आहे. पण त्यामुळे वैदर्भीय बोलीची गळचेपी होऊ नये, असं त्यांना वाटतं. ही भाषेविषयी अत्यंत व्यापक भूमिका आहे. समतामूलक समाजनिर्मितीसाठी माणसा-माणसातील संवाद अधिक संपन्न व्हावा, ही भूमिका येथील सामान्य माणसाची आहे.
– डॉ.शांतरक्षित गावंडे