विशेष लेख – दिल्ली येथील 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मराठी भाषेचा इतिहास

– मराठी भाषा ही इंडो-युरोपीय भाषाकुळातील एक भाषा आहे. मराठी भाषेला २४०० वर्षांचा समृद्ध इतिहास आहे. मराठी भाषेची निर्मिती संस्कृतमधून निर्माण झालेल्या महाराष्ट्री प्राकृत व अपभ्रंश या भाषांपासून झाली आहे. नव्या संशोधनानुसार मराठी अन् प्राकृत ह्या एकच भाषा असल्याचे सप्रमाण सिद्ध केले आहे. मराठीतील आज उपलब्ध असलेला पहिला ग्रंथ गाथा सप्तशती हा सुमारे २००० वर्षांपूर्वीचा आहे. इ.स.१११० मध्ये मुकुंदराजांनी ‘विवेकसिंधु’ या ग्रंथाद्वारे शंकराचार्यांच्या वेदांतावर निरूपणात्मक विवेचन केले आहे. इ.स. १२७८ मध्ये म्हाइंभट यांनी ‘लीळाचरित्र’ लिहिले. त्यानंतर इ.स. १२९० मध्ये ‘ज्ञानेश्वरी’ या ग्रंथाची रचना ज्ञानेश्वरांनी केली. महानुभाव संप्रदायाने मराठी साहित्यात मौलिक भर घातली.

संत एकनाथ यांनी या भाषेत भारुडे लिहिली आणि ‘एकनाथी भागवत’, ‘भावार्थ रामायण’ आदि ग्रंथांची भर घातली. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. स्वराज्याची राजभाषा म्हणून मराठीची निवड केली. अमराठी शब्दांचा वापर टाळण्यासाठी शिवरायांनी मराठीचा १४०० शब्दांचा ‘राजव्यवहारकोश’ तयार करून घेतला. आणि पेशव्यांनी या साम्राज्याचा विस्तार केला. इ.स. १९४७ नंतर स्वतंत्र भारत देशाने मराठीला अधिकृत भाषेचे पद दिले. इ.स. १९६० मध्ये मराठी भाषिकांच्या एकसंघ महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली आणि मराठीस राजभाषेचा मुकुट प्राप्त झाला. इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर काही लेखनकृतींनी वा ताम्रपट, शिलालेख यांनी मराठी भाषा दस्तऐवजीकरण करण्यास हातभार लावला आहे. प्रदिर्घकाळ केंद्रशासनात प्रलंबीत राहिलेला मराठी भाषेच्या अस्मितेचा निशान असलेल्या मराठी भाषेला ‘अभिजात भाषेचा दर्जा दि. 3 ऑक्टोबर 2024 रोजी जाहिर झाला.

दिल्ली येथील मराठी साहित्य संमेलन – एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ग्रंथ व्यवहाराशी संबंधित काही मंडळी पुण्यात एकत्र आली आणि 1878 मध्ये त्यांनी पहिले ग्रंथकार संमेलन घडवून आणले. 71 वर्षापूर्वी नवी दिल्ली येथे 1954 साली ऑक्टोंबर महिन्यात 37 वे मराठी साहित्य संमेलन झाले होते. तेव्हा, महाराष्ट्र राज्याची निर्मितीही झाली नव्हती आणि अ.भा.मराठी साहित्य महामंडळही अस्तित्वात नव्हते. या साहित्य संमेलनाचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान पंडीत नेहरु यांनी केले होते. त्त्यानंतर आता जवळजवळ 70 वर्षांनी यंदा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिल्यांदा दिल्ली येथे 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होऊ घातले आहे. येत्या 21 ते 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये दिल्ली येथील तालकटोरा स्टेडिअममध्ये उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे.

यंदाच्या 98 व्या संमेलनाचे उद्घाटक पंतप्रधान नरेंद्र मोदी असून, अध्यक्षपदाचा मान डॉ.ताराबाई भवाळकर यांना मिळाला आहे. तर स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवार आहेत. या साहित्य संमेलनाला साहित्यिक, कवि, विचारवंत, रसिक, वाचक दिल्ली येथे हजेरी लावणार असून, मराठी व अमराठी रसिकांसाठी ही आनंदाची पर्वणी ठरणार आहे. भाषा, संस्कृती, राष्ट्रभावना, मानवता आणि एकात्मता यांचा आगळा मिलाफ यानिमित्ताने महाराष्ट्र वा देशातीलच नव्हे, अवघ्या जगातील साहित्यरसिक देशाच्या राजधानीत अनुभवणार आहेत.

या संमेलनात वाचन, मुलाखत, परिसंवाद असे वेगवेगळे एकापेक्षा एक सरस भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. 21 फेब्रुवारीला उद्घाटनानंतर सायंकाळी 6.30 वाजता दुसरे सत्र सुरु होईल. यावेळी मावळते संमेलनाध्यक्ष डॉ.रविंद्र शोभणे यांचे पूर्वाध्यक्ष भाषण होईल, तर संमेलनाच्या अध्यक्षा डॉ.तारा भवाळकर यांचे अध्यक्षीय भाषण होईल. पहिल्या दिवशी सायंकाळी अखेरच्या सत्रात निमंत्रितांचे कवी संमेलन होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील तसेच दिल्लीतील निवडक नामवंत कवी सहभागी होणार आहेत. तत्पूर्वी सकाळी ग्रंथदिंडी काढण्यात येणार असून ध्वजारोहण होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा.उषा तांबे याच्या हस्ते ग्रंथदिंडीस प्रारंभ होणार आहे. या दिंडीत साहित्यिक, साहित्यप्रेमी, ‍मराठी मंडळी सहभागी होणार आहेत. विविध कला पथकेही या दिंडीत सहभागी होतील.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

पोहरा नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पातील कामांची आयुक्तांनी केली पाहणी

Thu Feb 20 , 2025
– नागरिकांच्या समस्या घेतल्या जाणून नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या पोहरा नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पा अंतर्गत सुरु असलेल्या विविध कामांची महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी गुरुवारी (ता. २०) पाहणी केली. त्यांनी मनीषनगर येथील शिल्पा सोसायटी आणि चिंचभुवन क्षेत्रात सुरु असलेल्या कामाच्या ठिकाणी भेट दिली व निरीक्षण केले. यावेळी संबंधितांना पाईप लाईन टाकल्यानंतर त्याचा योग्य प्रकारे पुनर्भरण व समतलीकरण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!