– पूज्य गुरुजींच्या तैलचित्राचे अनावरण
नागपूर :-पूज्य गुरुजींची कामे धर्माच्या विश्लेषणातून चालत होती, संघाचेही कार्य तसेच आहे. समाज हा संघटितच असला पाहिजे. एकमेकांच्या सहयोगाने आपणही समर्थ व्हावे व समाजही समर्थ करावा. आपण जे काही करतो, तो धर्म आहे. तो सचोटीने, प्रामाणिकपणे जपला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे केले.
धरमपेठ महिला स्टेट को. ऑप सोसायटीच्या शिवाजीनगर स्थित सीताराम सभागृहात मंगळवारी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे हस्ते द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर उपाख्य श्री गुरुजी यांच्या तैलचित्राचे अनावरण झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर धरमपेठ महिला स्टेट को-ऑप सोसायटीच्या अध्यक्षा निलिमा बावणे व उपाध्यक्षा सारिका पेंडसे उपस्थित होत्या.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना सरसंघचालकांनी पूज्य गुरुजींच्या अनेक हृद्य आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, गुरुजी जे बोलत असत, ते पाळत असत व जे पाळता येईल तेच बोलत असत. पूज्य गुरुजींच्या ठायी आप परभाव यांचा विलोप झाला होता. त्यांच्या आत्मीयतेचा स्पर्श केवळ स्वयंसेवकच नाही तर त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना झाला होता. प्रामाणिकपणा असल्यामुळे त्यांच्यात शिस्त आपसुकच होती. ते ज्याठिकाणी जायचे त्या ठिकाणच्या अनुशासनाचे पालन करायचे.
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत धरमपेठ महिला सोसायटीच्या कार्याची प्रशंसा करताना म्हणाले की, ‘मातृशक्तीच्या उत्थानाचे एक महान लक्षण म्हणजे ही संस्था आहे. या संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालिका सर्व महिला आहेत. स्त्रीच्या स्वभावातच वात्सल्य असते, त्यामुळे ती सर्व कामे आत्मीयतेने करते. महिलांना मोकळीक दिली तर पुरुष जी कामे करतात ती सर्व कामे महिला करू शकतात.’
सारिका पेंडसे यांनी सरसंघचालकांचा परिचय करुन दिला. नीलिमा बावणे यांनी प्रास्ताविक तर आभार प्रदर्शन अंजनी राऊत यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमानंतर सरसंघचालकांच्या हस्ते संस्थेच्या आवारत स्थापन करण्यात आलेल्या गणपतीची आरती करण्यात आली.