– मंत्री संजय राठोड यांच्या प्रयत्नांतून श्री फकिरजी महाराज व श्री नामदेव महाराज संस्थांनचा कायापालट
यवतमाळ :- नेर तालुक्यातील धनज माणिकवाडा येथील श्री फकिरजी महाराज संस्थान व श्री नामदेव महाराज देवस्थान या ‘ब’ वर्ग श्रेणीतील तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी ग्रामविकास विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करून दोन्ही संस्थानसाठी एकूण सहा कोटी ३३ लाखांचा विकासकामांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मंजूर करून घेतली.
ग्रामविकास विभागाने या संदर्भात ५ सप्टेंबररोजी शासन आदेश निर्गमित केला असून या दोन्ही संस्थानच्या विविध विकासकामांसाठी हा निधी वितरित होणार आहे. नेर तालुक्यातील धनज माणिकवाडा येथील श्री फकिरजी महाराज संस्थान व श्री नामदेव महाराज देवस्थान ही दोन्ही तीर्थक्षेत्रे नागरिकांची श्रद्धास्थानं आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते. यात्रा काळात दोन्ही संस्थानमध्ये अलोट गर्दी उसळते. त्यामुळे या भागाचे आमदार असलेले पालकमंत्री संजय राठोड यांनी या दोन्ही संस्थांना यापूर्वीच तीर्थस्थळाचा ‘ब’ वर्ग दर्जा मिळवून दिला. हा दर्जा मिळाल्याने या दोन्ही तीर्थस्थळांचा कायापालट होण्यास सुरूवात झाली. पालकमंत्री संजय राठोड यांनी ग्रामविकास विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करून ग्रामीण भागातील तीर्थ व यात्रास्थळांच्या विकासासाठी असलेल्या योजनेतून या दोन्ही तीर्थस्थळांच्या विकासासाठी निधी मंजूर करून घेतला.
धनज माणिकवाडा येथील श्री फकिरजी महाराज संस्थान येथे स्वच्छतागृहाचे बांधकाम, भोजनकक्ष, स्वयंपाकगृह, परिक्रमा सभागृह, वाहनतळ, सभागृह, संरक्षण भिंत आदी विकासकामांसाठी चार कोटी रूपयांचा निधी ग्रामविकास विभागाने वितरित केला. माणिकवाडा येथील श्री नामदेव महाराज देवस्थान या ‘ब’ वर्ग श्रेणीतील तीर्थस्थळी भक्त निवासाचे वाढीव बांधकम, पेव्हमेंट ब्लॉक, स्वयंपाकगृह, संरक्षण भिंत बांधकामासाठी दोन कोटी ३३ लाख ३९ हजार रूपयांचा निधी वितरित केला. या दोन्ही तीर्थस्थळांसाठी निधी मिळाल्याने येथे येणाऱ्या भाविकांना त्याचा मोठा लाभ होणार आहे. शिवाय या विकासकामांमुळे यात्रा काळात भाविकांची गैरसोय टळणार असल्याने भक्तांमध्ये आनंद व्यक्त् होत आहे. दोन्ही संस्थानच्या विश्वस्तांनी आज शनिवारी पालकमंत्री संजय राठोड यांची भेट घेवून विकासनिधी दिल्याबद्दल आनंद व्यक्त करून त्यांचा सत्कार केला व आभार मानले.