– महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षांची मनपात बैठक
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरात राबविण्यात येत असलेले पर्यावरण विषयक प्रकल्प आणि उद्भवणारे प्रश्न यासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी गुरुवारी (ता.२०) आढावा घेतला.
मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील आयुक्त सभा कक्षामध्ये आढावा बैठक पार पडली. बैठकीत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, उपायुक्त विजय देशमुख, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, प्रदुषण निमंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकारी डॉ. हेमा देशपांडे, सहसंचालक रविन्द्र अंधाळे, परिवहन विभागाचे प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, कार्यकारी अभियंता राजेश दुफारे यांच्यासह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीपूर्वी सिद्धेश कदम यांनी मनपाचे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, भांडेवाडी येथील घनकचरा प्रक्रिया प्रकल्पांना भेट देउन पाहणी केली.
बैठकीमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी घनकचरा व्यवस्थापन, शहरातील सांडपाणी व्यवस्था व त्याची शुद्धीकरण यंत्रणा आणि त्या संदर्भातल्या भविष्यातील उपाययोजना, शहरातील नियोजित पाणीपुरवठा वाहिनीचा कृती आराखडा, सिंगल यूज प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण आणि त्याचबरोबर शहरातील हवा प्रदूषणाचा प्रश्न या विषयांचा आढावा घेतला व त्यावर सविस्तर चर्चा केली. यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी नाग नदी, पिवळी नदी आणि पोहरा नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाच्या कार्याची माहिती दिली. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात नदीमध्ये सांडपाण्याचा निचरा होउ नये यादृष्टीने कार्य करण्यात येत आहे. नदीच्या प्रवाहामध्ये मलवाहिन्यांचे पाणी सोडले जाउ नये याकरिता मलजलवाहिन्या बदलविण्यात येणार असल्याची देखील माहिती आयुक्तांनी दिली. या प्रकल्पाच्या कार्यासोबतच तात्पुरत्या उपाययोजना करण्याचे निर्देश सिद्धेश कदम यांनी दिले.
मोठ्या शहरांमध्ये भेडसावणारी वायू प्रदूषणाची समस्या नागपूर शहरात भेडसावू नये यादृष्टीने उपाययोजना करण्याकडे लक्ष देण्याबाबत देखील कदम यांनी निर्देश दिले. राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम अंतर्गत दहन घाटांमधून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे धोरण निर्धारित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. वाहनांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी नागपूर महानगरपालिकेला सहा रोड स्विपिंग मशीन उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. सिंगल यूज प्लास्टिकचा वापर प्रतिबंधित करण्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. सिंगल यूज प्लास्टिकचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्यासाठी मनपा आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने समन्वयाने काम करण्याचेही निर्देश सिद्धेश कदम यांनी दिले. त्यांनी मनपा आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संबंधित कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण आयोजित करण्याबाबत देखील त्यांनी निर्देश दिले. सर्वसामान्य नागरिकांनी बाजारात जाताना कापडी पिशवी घेउन जावी, सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करु नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.