– आयएमएतर्फे आज दोन अंकी दर्जेदार विनोद नाटक
नागपूर :-इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे ‘शांतेचं कार्ट चालू आहे’ या दोन अंकी तुफान विनोदी नाटकाचा पहिला प्रयोग शुक्रवार, 9 फेब्रुवारीला सायंकाळी 6 वाजता, तर दुसरा प्रयोग रविवार, 11 फेब्रुवारीला सायंकाळी 5.30 वाजता आयएमएच्या जेआर शॉ ऑडिटोरियम सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
कुटुंबावर नियंत्रण मिळविण्याच्या नादात आईचा कसा गोंधळ उडतो आणि त्यातून प्रत्येक क्षणाला विनोदाचे फव्वारे उडतात. आईने कुटुंबातील सर्वच सदस्यांसोबत प्रेमाने वागावे म्हणून श्याम वडिलांना खोटे प्रेमपत्र लिहितो. आई तर सरळ होते, पण बनावट प्रेयसी टपकते. मग काय सार्यांचाच गोधळ उडतो. एक गोंधळ शांत होत नाही तोच श्यामची खरी प्रेयसी उपस्थित होताच सारेच बुचकळ्यात पडतात. हास्याचे कारंजे उडविणार्या तुफान विनोदी नाटकाचा प्रयोग आयएमएचे डॉक्टर्स सादर करणार आहेत.
डॉक्टरांचा सततचा वेळ तणावाखाली असतो. कुठेतरी विरंगुळा म्हणून मराठी नाटकाची मागील तीस वर्षांपासूनची परंपरा आयएमएने जोपासली आहे. डॉक्टरांना त्यांच्यातील कला सादर करण्यासाठी आयएमएने व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. दरवर्षी एका मराठी नाटकाचा प्रयोग सादर केला जातो. यंदा ‘शांतेचं कार्ट चालू आहे’ या दोन अंकी नाटकात सात पात्रे आहेत. संजय पेंडसे यांचे दिग्दर्शन आहे. श्यामची मुख्य भूमिका डॉ. प्रशांत भांडारकर यांनी, तर आईची भूमिका डॉ. अंजली भांडारकर आणि वडिलांची भूमिका डॉ. आशीष थूल साकारणार आहेत. यासोबतच डॉ. शिवानी सुळे, डॉ. अभिजित अंभईकर, डॉ. स्मिता देसाई आणि डॉ. समीर जहागीरदार यांच्या भूमिका पोट धरून हसविणार्या आहेत. विनोदी नाटकाचा नागपूरकरांनी आनंद घ्यावा, असे आवाहन संयोजक डॉ. प्रशांत भांडारकर यांनी केले आहे.