– विभागातील २९ अधिछात्रवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सहभाग
नागपूर :- 350 वा शिवराज्याभिषेक आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या 150 व्या जयंतीच्या औचित्याने 6 ते 26 जून 2024 दरम्यान सारथी नागपूर विभागीय कार्यालयाच्या अधिछात्रवृत्तीधारक 29 विद्यार्थ्यांनी 5000 सीड बॉल तयार करुन किल्ले परिसर व ओसाड ठिकाणी फेकण्याचा अभिनव उपक्रम राबविला.
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) नागपूर विभागीय कार्यालयाची अधिछात्रवृत्तीधारक नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यातील 29 संशोधक विद्यार्थ्यांनी शिवराज्याभिषेक आणि छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्ताने चिंच, सुबाभूळ, आंबा, कडूनिंब, सीताफळ, करंजी, चिकू, जांभूळ, आवळा, आदी बिया वापरून सुमारे 5 हजार सीडबॉल तयार केले. या विद्यार्थ्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशाह किल्ला व भंडारा जिल्ह्यातील पवनी किल्ला परिसरात तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसर व रस्त्याच्या कडेला सीडबॉल फेकले. तसेच 26 जून रोजी छत्रपती शाहू महाराज जयंतीदिनी सारथी नागपूरचे उपव्यवस्थापकीय संचालक तथा उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांच्या नेतृत्वात कार्यालयाच्या अधिकारी -कर्मचाऱ्यांनी सूराबर्डी परिसरात 700 सीडबॉल फेकले.