मुंबई :- शिवसेनेचे हिंदूत्व आहे ते लपवून ठेवत नाही ते हिंदूत्व अठरापगड जातींच्या लोकांना घेऊन जाणारे आहे. तर भाजपचे हिंदूत्व आहे ते विभाजनवादी, विषारी, मनुवादी आणि विघातक आहे. माणसामाणसामध्ये वितंडवाद वाढवणार… विद्वेष वाढवणारं आहे अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत केला.
आज राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे मोठ्या गर्दीत पार पडली. यावेळी शरद पवार यांनी येणाऱ्या संकटाना सामोरे जाताना ‘अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली’ अशी हाक दिली.
मधल्या काळात शाहूंच्या कोल्हापूरात, अकोला, नांदेड याठिकाणी दंगली झाल्या. या दंगलीत कोण होतं हे सर्वांना माहित आहे. जाणीवपूर्वक या दंगली केल्या. जिथे आपली सत्ता नाही त्याठिकाणी समाजासमाजात विद्वेष वाढवायचा आणि त्याचा राजकीय फायदा घेता येईल का यासंबंधी भूमिका घेतली गेली असा आरोपही शरद पवार यांनी केला.
जो समाजातील ऐक्याला तडा लावतो. जातीय धर्मात अंतर वाढवतो तो राष्ट्रप्रेमी असूच शकत नाही. आज जे राष्ट्रप्रेमी नाहीयेत त्यांच्याबरोबर जाण्याची भूमिका घेणार नाही. या सगळ्या परिस्थितीत महागाईचा, बेरोजगारीचा प्रश्न आहे.महाराष्ट्रात सहा महिन्याच्या कालावधीत चार हजारपेक्षा महिला बेपत्ता झाल्या. मुली सुरक्षित नाही. त्यांना राज्य चालवण्याचा अधिकार नाही असेही शरद पवार यांनी ठणकावून सांगितले.
हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चालणारे आहे. त्यांनी आदर्श आपल्यासमोर ठेवला आहे. त्यामुळे या लोकांवर भरवसा ठेवणं योग्य नाही. त्यांना सत्तेपासून बाजूला करणं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सक्षम करणं हा एककलमी कार्यक्रम करायचा आहे असे आवाहनही शरद पवार यांनी केले.
आज चर्चा आहे कुणासोबत किती आमदार आहेत याची. आमदार आणता येतात. गेले त्यांची चिंता करू नका ते सुखाने राहू देत. जोपर्यंत आपण एकत्र आहोत तोपर्यंत आपण सामुहिक शक्तीतून नक्की नव्याने कर्तृत्ववान अशा लोकांची पिढी, नेतृत्वाची पिढी महाराष्ट्रात निर्माण करु असा आत्मविश्वास शरद पवार यांनी कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केला.
आजची बैठक ऐतिहासिक आहे संबंध देशाचे लक्ष लागले आहे तशी चर्चाही या बैठकीची सुरू आहे. २४ वर्षापूर्वी मुंबईत तुमच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा जन्म झाला. शिवाजी पार्कवर या पक्षाची स्थापना केली. २४ वर्षे झाली यामध्ये आम्हाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेतृत्वाची फळी उभी करण्यात राष्ट्रवादीला यश आले. अनेक कार्यकर्ते आमदार, मंत्री, खासदार झाले. सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता राज्य कसं चालवू शकतो हे राष्ट्रवादीमुळे देशाला समजले. अनेक नवीन नेते तयार केले. मनात एकच भावना होती की, महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. महाराष्ट्रातील शेवटच्या माणसाच्या जीवनात प्रकाश कसा येईल याची काळजी घेतली त्यामध्ये तुमच्या कष्टाने आपण त्यामध्ये यशस्वी झालो. आज आपल्याला आणखी पुढे जायचे आहे. संकटे खूप आहेत.ती संकट ज्याची वैचारिक भूमिका देशाच्या हिताची नाही अशांच्या हातामधे देशाची सूत्रे आहेत. ज्यांच्या हातामध्ये सुत्रे आहेत त्यांच्यापुढे त्यांच्या सहकाऱ्यांनासुध्दा त्यांना म्हणावी तशी कल्पना मांडण्यासंदर्भात मर्यादा आहेत असेही शरद पवार म्हणाले.
केंद्र सरकारमध्ये मी काम केले आहे मनमोहन सिंग यांच्याबरोबर काम केले. विरोधी पक्षनेता म्हणून दिल्लीत काम केले. या सगळ्यांच्या कामाची पद्धत बघितली आहे. एखादी गोष्ट योग्य नसेल, जनतेची भावना वेगळी असेल तर त्यासंबंधी सुसंवाद साधणे त्यातून मार्ग काढणे हे सुत्र या देशात अनेक वर्षापासून चालू होते. आज चित्र बदलले आहे लोकशाहीमध्ये सरकार व जनता यामध्ये सुसंवाद असणे गरजेचे आहे. मी चारवेळा राज्याचा मुख्यमंत्री होतो. माझी पध्दत होती आपण महत्वाचा निर्णय घेतलातर त्या निर्णयासंबधी सामान्य माणसाची काय प्रतिक्रिया आहे जाणून घ्यायची असेल तर संवाद ठेवावा लागतो लोकांशी बोलावे लागते लोकांचे म्हणणे ऐकून घ्यावे लागते. जे अयोग्य असेल ते दुरुस्त केले पाहिजे आज तो संवाद देशात नाही. आम्ही सगळेजण सत्ताधारी पक्षात नाही.लोकांमध्ये आहोत. कधीकाळी सामान्य माणसाची दु:ख आणि त्यांची स्थिती समजते त्यातून मार्ग काढण्याची इच्छा असते पण संवाद राज्यकर्त्यांचा नसेल तर चित्र वेगळे दिसते. आज सर्व राज्यात एकप्रकारे अस्वस्थता आहे. आम्ही लोकांनी प्रयत्न सुरू केले लोकशाहीला टिकवायची असेल, संसदीय पध्दतीला शक्ती द्यायची असेल तर हा संवाद सुरू करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि पहिला संवाद आम्ही सत्ताधारी पक्षात नाही त्यांच्याशी साधला. त्यामुळे ज्यांच्या हातात सत्ता त्यांच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली. पंतप्रधानांनी तर राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचा आरोप केला. त्याअगोदर बारामतीच्या सभेत प्रशासन कसे चालवायचे हे पवारसाहेबांचे बोट धरुन शिकलो. नंतर निवडणूकीत आले तेव्हा प्रचंड टिका केली. जे देशाचे नेतृत्व करतात त्यांनी संयमी बोलण्याची काळजी घेतली पाहिजे. नुसते आरोप करुन चालणार नाही. जर कुणी चुकीचे काम केले असेल तर त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. सत्य सांगितले पाहिजे. पण त्यांनी ती धमक दाखवली नाही. देशाचे नेते आहोत, राष्ट्रीय पक्षाचे आहातच परंतु जनसामान्यांच्यासमोर बोलतो त्यावेळी त्याप्रकारची सभ्यता आणि मर्यादा पाळल्या पाहिजेत त्या पाळल्या जात नाहीत अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी इतका भ्रष्ट आहे असे वाटत असेल तर कालच्या शपथविधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला का बरोबर घेतले. तुमच्या मंत्रीमंडळात कसे काय? याचा अर्थ असा आहे आधार नसलेल्या गोष्टी बोलत आहेत. जनमाणसामध्ये एकप्रकारे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. आज विधिमंडळाचे सदस्य, सत्ताधारी पक्षाचे आमदार, खासदार, खाजगीत सांगतात असेही शरद पवार म्हणाले.
आज काही लोकांनी बाजुला जाण्याची भूमिका घेतली माझी काही तक्रार नाही मला त्याचे दु:ख आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घाम गाळून विधीमंडळात आणण्यासाठी प्रयत्न केले त्यांना चांगले दिवस आणले. त्यांना विश्वासात न घेता पक्षाला विश्वासात न घेता वेगळी भूमिका घेतली हे योग्य नाही. चुकीच्या विचारांच्या बाजूला जाऊन बसण्याची वेळ आली हे चांगले नाही असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.
नाशिकला पक्षाच्या कार्यालयात ताबा घेण्याचा प्रयत्न झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहात का? तुम्ही सांगा आम्हीच राष्ट्रवादी काँग्रेस असे कसे म्हणता येईल. उद्या कुणीही उठेल मी राष्ट्रवादीचा आहे सांगेल, मी शिवसेना आहे सांगेल, मी भाजप आहे सांगेल, याला काही अर्थ आहे का? त्यामुळे अशाप्रकारची भूमिका मांडून ताबा घेणे योग्य नाही.हे लोकशाही मध्ये योग्य आहे का? असा सवाल करतानाच यासाठी शरद पवार यांनी कॉंग्रेसमध्ये असताना टिळकभवन आमच्याकडे होते नवीन पक्ष काढायचा निर्णय घेतला त्यानंतर ते कार्यालय सोडून देण्याचा निर्णय घेतला ती प्रॉपर्टी कॉंग्रेस पक्षाची होती. आम्ही ती हिसकावून घेतली नाही ही आठवण सांगितली. काल नाशिकमध्ये पक्षाची प्रॉपर्टी काही लोक पोलिसांची मदत घेऊन घेत आहेत. हा पक्ष आमचा आहे घड्याळ आमचे, त्यावरील चिन्ह आमचे आहे. ठिक आहे. तुम्ही म्हणू शकता निवडणूक आयोगाने घड्याळाचे चिन्ह कुणाला दिले हे देशाला माहित आहे. तुमच्यासाठी सांगतो कोण कुठे जाणार नाही. हे चिन्ह देशाचे राजकारण ठरवते माझ्या व्यक्तीगत जीवनात अनेक निवडणूका लढलो आहे. १९६७ साली पहिली निवडणूक केली माझे चिन्ह बैलजोडी होती. त्यानंतर कॉंग्रेसमध्ये दोन भाग झाले. बैलजोडी गेली गायवासरु चिन्ह आले. त्यानंतर चरखा नंतर हात आला मग घड्याळ आले. मी हात, चरखा, गायवासरु, बैलजोडी या चिन्हावर लढलो त्यामुळे कोण सांगत असतील चिन्ह आम्ही घेऊन जाऊ पण एक सांगतो चिन्ह जाणार नाही आणि मी ते जाऊ देणार नाही असेही शरद पवार यांनी ठणकावून सांगितले.
चिन्ह घेऊन जाणार असाल तर कुठलंही चिन्ह असेल. जोपर्यंत सामान्य माणसाच्या अंतःकरणात पक्षाचा विचार आणि कार्यकर्त्यांची भूमिका खोल आहे तोपर्यंत काही चिंता करण्याचे कारण नाही असा विश्वासही शरद पवार यांनी दिला.
लढाई केवळ पावसामुळे लढली जाते असे नाही, तर लढाई ही हुशारीने जिंकली जाते….
देशात संविधान तुडवले जात असल्याचे चित्र दिसते. आमदार हा खरेदी-विक्री संघ आहे, की कांद्याचा भाव आहे अशी टीका पक्षाचे प्रतोद आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली.
निवडणुकीच्या प्रचारासाठी तुम्हाला आदरणीय शरद पवारसाहेब लागतात. आता अचानक तुम्ही म्हणता की, आम्हाला शरद पवार नको. तुम्ही साहेबांचा चेहरा का वापरता. तुम्ही मतदारांना आकर्षित करू शकाल असे चेहरे वापरावे. तुम्हाला निवडून आणण्यासाठी तोंडातून रक्त गळत असतानाही प्रचारासाठी उभ्या राहिलेल्या बापाला इतकं दुःख देता. ज्याला गुरु बोलायचे त्यालाच दुःख द्यायचे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. तुम्ही पवार साहेबांना जखमी करून टाकलंय. पण हा जखमी शेर आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. जे आमदार पवार साहेबांसोबत आहेत ते वाचतील अन्यथा इतर सर्व घरी जातील, असा स्पष्ट इशाराही जितेंद्र आव्हाड यांनी दिला.
शरद पवार माझी खासगी मालमत्ता आहे का अशी विचारणा केली जाते. मात्र ही सरंजामशाहीची पद्धत माझ्यात नाही. मी त्यांच्या पायाची धूळ आहे. पण जेव्हा बापावर येते तेव्हा छातीचा कोट करण्याचा महाराष्ट्राचा इतिहास आहे. इथे सर्व पांडव आहेत आणि आपला श्रीकृष्ण हे शरद पवार साहेब आहेत. इतिहास सांगतो की अधर्माविरोधात धर्माची लढाई होते, तेव्हा धर्माचा पराभव होऊ शकत नाही. नाशिकला साहेब येणार तेव्हा हिंमत असेल तर त्यांना अडवून दाखवा, असे आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी दिले.
या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार अमोल कोल्हे, माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार शशिकांत शिंदे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, राष्ट्रीय सरचिटणीस नरेंद्र वर्मा, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण, मुंबई कार्याध्यक्षा राखी जाधव, आमदार सुनिल भुसारा, आमदार रोहित पवार, आमदार अशोक पवार, आमदार सुमन पाटील, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार चेतन तुपे, आमदार बाळासाहेब पाटील आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार एकनाथ खडसे, खासदार वंदना चव्हाण, खासदार फौजिया खान आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते