नवी दिल्ली :- महाविकास आघाडीच्या तीनही घटक पक्षनेत्यांच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत बहुतांश जागांवर सहमती झाली असून शिवसेनेच्या ठाकरे गटाला सर्वाधिक जागा दिल्या जाणार असल्याचे समजते. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गट हाच मोठा भाऊ असेल, हे जवळपास निश्चित असून उर्वरित जागांचे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये समसमान वाटप होण्याची शक्यता आहे. काही जागासंदर्भात तिढा कायम असून दिल्लीत वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेमध्ये सोडवला जाणार आहे.
काँग्रेसच्या राष्ट्रीय आघाडी समितीचे समन्वयक मुकुल वासनिक यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची सुमारे अडीच तास बैठक झाली. या बैठकीला वासनिक यांच्यासह अशोक गेहलोत, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जितेंद्र आव्हाड व शिवसेनेच्या वतीने संजय राऊत, विनायक राऊत आदी राज्यांतील नेते उपस्थित होते. ठाकरे गटाने २३ जागांची तर, काँग्रेसने २३ हून अधिक जागांची मागणी केली आहे. त्यामुळे राज्यातील जागावाटपामध्ये मुख्यत्वे शिवसेना व काँग्रेसमध्ये तीव्र रस्सीखेच सुरू आहे. वासनिक यांच्या निवासस्थानी झालेल्या चर्चेमध्ये प्रामुख्याने याच दोन पक्षांच्या नेत्यांची जागांसंदर्भात देवाणघेवाण झाल्याचे समजते. ‘गेल्या वेळी आम्ही २३ जागा लढवल्या असल्यामुळे यावेळीही तितक्याच जागांची मागणी केली आहे. शिवसेनेमध्ये फूट पडली असली तरी, शिवसेनेचा मूळ मतदार आमच्या पासून दूर गेला असे नव्हे’, असा युक्तिवाद करत शिवसेनेचे (ठाकरे गट) राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी बैठकीपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत जागावाटपातील हिस्सेदारीचे समर्थन केले होते. ‘इंडिया’च्या घटक पक्षांच्या नेत्यांची लवकरच बैठक होणार असून त्यावेळी महाविकास आघाडीच्या जागावाटपावर काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बैठकीमध्ये शिक्कमोर्तब केले जाऊ शकेल.