मुंबई :- भाजप-शिंदेसेना-अजित पवार गट या महायुतीला अद्याप ११ लोकसभा जागांचा फैसला करता आलेला नाही. त्यामुळे या जागांवरून स्थानिक पातळीवरील अस्वस्थता कायम असून तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात, याबाबतची उत्सुकता कायम आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतही काही जागांवरून धुसपूस सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटातील तणाव काहीसा वाढताना दिसत आहे. यातच ठाकरे गटाने पुन्हा एकदा काँग्रेसला डिवचल्याचे सांगितले जात आहे.
ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी महाविकास आघाडीचे घटकपक्ष असलेल्या काँग्रेस आणि ठाकरे गटातील तणावावर थेट शब्दांत भाष्य केले आहे. मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव असला तरी त्यावर आमचे नेते निर्णय घेतील. उद्धव ठाकरे यांचे एक विधान मी ऐकले. मैत्री पूर्ण आणि लढत, याचा अर्थ मैत्री पूर्ण होते, संपते आणि लढतीला सुरुवात होते. आम्ही निवडून आलेल्या जागा काँग्रेसला दिलेल्या आहेत, असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडीसाठी शिवसेनेने मोठा त्याग केला आहे
मागील निवडणुकीत शिवसेना २३ जागांवर लढली होती. त्यापैकी १८ जागांवर उमेदवार निवडून आले. शिवसेनेने निवडून आलेल्या जागांपैकी कोल्हापूर, रामटेक, अमरावती या जागा सोडल्या. महाविकास आघाडीसाठी शिवसेनेने मोठा त्याग केला आहे. त्याची नोंद महाविकास आघाडीकडे असेल, असे मी समजतो. तसेच रामटेकची जागाही त्यांना दिलेली आहे. महाराष्ट्रात एका ठिकाणी कुठे गडबड झाली, तर बाकीच्या ठिकाणी त्याचे परिणाम होऊ शकतात, याची नक्की जाणीव महाविकास आघाडीच्या नेत्यांना आहे, असा इशारा भास्कर जाधव यांनी दिला.
दरम्यान, पत्रकारांशी बोलताना, सांगलीच्या जागेचा पुनर्विचार होणार नाही. अमरावतीसह अन्य ठिकाणचे शिवसैनिकही नाराज आहेत. आम्ही प्रचाराला सुरुवात करत आहोत. सांगलीसह सगळीकडे शिवसेनेच्या प्रचाराला सुरुवात करावी, असे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला थेटपणे सांगितले आहे. यावर, मैत्रीपूर्ण लढत होणार का, यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मैत्रीपूर्ण लढत होत नाही. एकतर मैत्री करा किंवा थेट लढत द्या, असे आव्हान उद्धव ठाकरेंनी दिले.