संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- तालुक्यातील आजनी येथे दरवर्षी प्रमाणे यंदा सुद्धा १९ फेब्रुवारीला मोठ्या थाटामाटात शिवजयंती साजरी करण्यात आली. गावातून एक फेरी काढल्यानंतर जिजाऊ उद्यान परिसरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक करून गावातील मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. यावेळी गावातील अनेक मान्यवर तथा शिवप्रेमी उपस्थित होते.
प्रियंका घोडे आणि बुंदेले यांनी शिवगर्जना करून मानवंदना दिली तर मातोश्री योगासन महिला मंडळ यांनी शिवस्तुती सादर केली तसेच अल्पोहाराचे आयोजन केले. जिल्हा परिषद शाळा आजनीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य आणि लेझीम सादर करून मंत्रमुग्ध केले. यावेळी सौंदर्यीकरणासाठी मेहनत घेणारे सुधाकर विघे व गोपीचंद जेवडे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
दरवर्षी प्रमाणे यंदा सुध्दा नवयुवक युवा मंडळाच्या पुढाकाराने आयोजित रक्तदान शिबिरात २८ दात्यांनी रक्तदान केले. संकलन लाईफ लाईन ब्लड बँकेने केले.
शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित शिवजयंती कार्यक्रमासाठी ग्राम पंचायत आजनी, नवयुवक युवा मंडळ, वीर बजरंग क्रीडा मंडळ, जय बजरंग क्रीडा मंडळ, सावित्रीबाई ज्योतीराव फुले अभ्यासिका आणि वाचनालय, रेणूका क्रीडा मंडळ तसेच गावातील सर्वच शिवप्रेमींनी सहकार्य केले. गावातील अनेक दानशूर व्यक्तींनी जिजाऊ उद्यान परिसरातील सौंदर्यीकरणासाठी दान देऊन हातभार लावला आहे.