राज्यातील प्रलंबित १२ आमदार नियुक्ती व संजय राऊत यांच्यावरील कारवाईसंदर्भात शरद पवारांनी घेतली पंतप्रधानांची भेट…
दिल्ली – केंद्रीय यंत्रणा करत असलेल्या कारवाईमुळे सरकारला कोणताही धोका नाही. सरकार चांगले चालले आहे. पुढील अडीच वर्षांने निवडणुका होतील तेव्हाही हेच सरकार येईल असा स्पष्ट विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
आज शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर दिल्लीत पत्रकार परिषद घेतली.
या भेटीत राज्यातील राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या प्रलंबित १२ आमदारांचा विषय आणि खासदार संजय राऊत यांच्यावर केंद्रीय यंत्रणेने केलेल्या कारवाईचा मुद्दा पंतप्रधानांच्या कानावर घातल्याचे शरद पवार यांनी यावेळी सांगितले.
संजय राऊत हे राज्यसभा सदस्य आहेत शिवाय ते सामनाचे ज्येष्ठ संपादक आहेत. त्यांच्यावर केंद्रीय यंत्रणेने कारवाई केली आहे याबाबत पंतप्रधानांना अवगत केले. त्यावेळी पंतप्रधानांनी प्रतिक्रिया दिली नाही परंतु यावर ते गंभीरतेने विचार करतील व योग्य ती पाऊले उचलतील असेही शरद पवार म्हणाले.
खासदार संजय राऊत यांच्यावर केंद्रीय यंत्रणेने कारवाई का केली? काय गरज होती असा सवालही यावेळी शरद पवार यांनी केला.
केंद्रीय तपास यंत्रणा कारवाई करते त्यावेळी त्याची जबाबदारी पंतप्रधानांची असते त्यामुळे हा विषय त्यांच्या कानावर घातला असेही शदर पवार यांनी स्पष्ट केले.
कोण काय बोलतो हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि कुणाच्या बोलण्यावरून भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच नाही. राज्यातील तिन्ही पक्षाने केंद्रीय यंत्रणांच्या विरोधात पाऊले उचलली आहेत आणि उचलत राहणार आहोत असेही शरद पवार यांनी स्पष्ट सांगितले.
सध्या राज्यातील मंत्रीमंडळात कोणताही बदल करण्यात येणार नाही असे पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार यांनी सांगितले.
युपीए अध्यक्ष पद आम्ही मागितलेले नाही. हे पद घ्यायला मी तयार नाही हे कितीतरी वेळा सांगितले आहे असेही शरद पवार यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.