-हिवाळी अधिवेशनामुळे एसटीच्या उत्पन्नात भर
-स्टेशन ते विधीमंडळ, निवासपर्यंत बससेवा
नागपूर :-एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनिकरण करावे, ही मागणी पूर्ण झाली नाही तरी हरकत नाही. परंतू विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात आले की, एसटी महामंडळाच्या आर्थिक उत्पन्नात नक्कीच भर पडते. यंदाही महामंडळाला दिड लाख रुपयाचे उत्पन्न मिळणार आहे. कारण आमदार आणि मंत्रालयातील कर्मचार्यांच्या सेवेत एसटी बस सज्ज असणार आहे.
कोरोनामुळे गेली दोन वर्ष हिवाळी अधिवेशन नागपुरात झाले नाही. त्यामुळे एसटीला मिळणार्या उत्पन्नापासून मुकावे लागले. यंदा हिवाळी अधिवेशन 19 डिसेंबरपासून नागपुरात होणार आहे. त्यानिमीत्त आमदार आणि मंत्रालयातील कर्मचार्यांना ने-आण करण्यासाठी एसटी महामंडळाकडून बससेवा देण्यात येत आहे. अधिवेशन कालावधीत एकूण 6 बस लावण्यात येणार आहे. बारा तासासाठी 11 हजार 600 रुपये या प्रमाणे एसटीचा दर ठरलेला आहे. विभागीय प्रशासनाने सहा बसची व्यवस्था केली असून रेल्वे स्थानक, विधीमंडळ परिसरात ते निवासस्थान या बस धावतील. विधीमंडळातील अधिकारी, कर्मचार्यांना याच बसने नि शुल्क प्रवास करता येणार आहे.
रविवार आणि सोमवार या दोन दिवशी म्हणजे 18, 19 आणि 25, 26 डिसेंबरला रेल्वे स्थानक परिसरात एसटी असेल. सेवाग्राम, विदर्भ एक्सप्रेसने स्टेशनवर येणार्या विधीमंडळातील कर्मचार्यांना या बसने त्यांच्या नियोजित स्थळी पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच 19 ते 31 डिसेंबर दरम्यान म्हणजे कामकाजाच्या दिवशी एसटीच्या 6 बसेस विधीमंडळ परिसरात असतील. या बसने कर्मचार्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी नंतर निवासस्थानी पोहोचविण्यात येणार आहे. सुटीच्या दिवशी म्हणजे शनिवारी बरेच कर्मचारी घरी जातात. त्यांना स्टेशनवर सोडण्यासाठी आणि स्टेशनवरून निवासस्थानी पोहोचविण्यासाठी या बसचा उपयोग केला जाणार आहे. यासाठी एसटी महामंडळाने 6 चालक आणि तीन निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. तसेच मागणी वाढल्यास दोन बस आणि चालक अतिरीक्त ठेवण्यात आले आहेत.
…चौकट…
660 कर्मचार्यांनी केला प्रवास
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला पाच दिवस शिल्लक असल्याने मंत्रालय नागपुरात पोहोचत आहे. शनिवार 10 डिसेंबर रोजी एसटी महामंडळाकडून 6 बस नागपूर रेल्वे स्थानकावर लावण्यात आल्या. विदर्भ, सेवाग्राम आणि दुरांतो एक्सप्रेसने आलेल्या 660 कर्मचार्यांना त्यांच्या नियोजित स्थळी सोडण्यात आले.