– गणेशपेठ आगारात गोंधळ
– पारंपारीक पध्दतीने तिकीट
नागपूर :-एसटीचे सर्व्हेर डाउन झाल्याने तिकीट मशिन बंद पडल्या अन् पुन्हा पारंपारीक पध्दतीने टिकटीक सुरू झाली. हा प्रकार शनिवारी सकाळी गणेशपेठ आगारात घडला. काही वेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. मात्र, 11.30 नंतर सर्वकाही सुरळीत झाले. यावेळी दोन बसगाड्यांना विलंब झाल्याची माहिती आहे.
पूर्वी प्रवाशांजवळ येणारा वाहक टिकटीक असे वाजवित यायचा. टिकटीक वाजले की, प्रवासी पैसे देवून तिकीट घ्यायचे. तंत्रज्ञानाच्या युगात एसटीही अत्याधुनिक झाली. टिकटीक एैवजी ईटीव्हीएम मशिन आल्या. या मशिन सर्व्हरशी जोडल्या असतात. शनिवारी सकाळच्या फेरीपासूनच सर्व्हर डाउन होते. चालक, वाहक अन् प्रवासी तयार. मात्र, ईटीव्हीएम मशिन बंद पडल्याने वाहकही थांबले. या बाबत माहिती मिळताच आगार व्यवस्थापकासह अधिकार्यांची धावपळ उडाली. त्यांनी वाहकांना पारंपारीक पध्दतीचा वापर करण्यास सांगितले. मात्र, काही वाहक इच्छुक नव्हते. यावेळी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. याप्रकारामुळे धुळे, औरंगाबाद एसटी विलंबाने सोडण्यात आली. बराच वेळानंतर वाहकांनी टिकटीक मशिन घेतले आणि पुढील प्रवासाला निघाले. सुत्राकडून मिळालेल्या माहिती नुसार सर्व्हरला उर्जा देणारे इर्न्व्हटर फार जुनाट झाले. यापुर्वी दुरूस्तीही करण्यात आली. आता बदलण्याशिवाय पर्याय नाही. जुने इर्व्हटर असल्याने तांत्रिक बिघाड होता. यावेळी वाहकांच्या आडमुठपणामुळे बस सोडण्यास विलंब झाला तसेच प्रवासीही त्रस्त झाले.
@ फाईल फोटो