नागपूर :- साधारण 32 वर्षापुर्वी दहावीतील सर्व मित्र-मैत्रिणींना परत एकदा एकत्र त्याच वर्गखोलीत बसून परत तेच जुने दिवस आठवण्याचा अनुभव कोराडी येथील विद्यामंदीर शाळेतील 1990 च्या ‘दहावी – अ’ च्या विद्यार्थ्यांनी नुकताच घेतला, एव्हढेच नव्हे तर आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत या विद्यार्थ्यांनी आयुष्यभर मैत्री कायम ठेवण्याचा देखील संकल्प केला.
मैत्री हा शब्द अगदी स्टिरियोटाइप वाटतो, पण बाल मित्रांना या दोन शब्दांमागील भावना, तीव्रता समजते. जिथे आपण या जगाला सामोरे जाण्यासाठी पावले टाकायला शिकलो… मोठे झालो, हा प्रवास बाल आणि शाळकरी मित्रांमुळे सुंदर आणि संस्मरणीय ठरला आहे. जिथे मी या जगाला सामोरे जाण्यासाठी पावले टाकायला शिकले, हा प्रवास माझ्या सहकाऱ्यांमुळे सुंदर आणि संस्मरणीय ठरला. त्यामुळे शाळेतील सोबत्यांना भेटण्याची संधी मिळाली, जी मी सोडणार नाही, याभावनेने सारे विद्थार्थी जमले.
विद्यामंदीर शाळेतील 1990 च्या ‘दहावी – अ’च्या तुकडीतील बहुतांश विध्यार्थी सर्वसामान्य घरातील होते. दहावी झाल्यानंतर प्रत्येकाने साजेशी प्रगती करीत यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केली, आज यापेकी कुणी प्रथितयश डॉक्टर, अभियंते, लेखक, पत्रकार, अधिकारी, उद्योजक व व्यावसायिक आहेत तर अनेकांनी राजकारणात देखील मानाचे स्थान मिळविले आहे. आपसातील लहान-मोठा, गरिब-श्रीमंत हा भेदाभेद विसरुन जवळपास 40 विध्यार्थी आणि विध्यार्थीनी या सावनेर जवळील शिवतिर्थ येथे एकत्रित आले.
माझी शाळा – माझा अभिमान, माझे मित्र –माझे सामर्थ्य. या भावनेने उजाडलेल्या एका उनाड दिवसाचा प्रारंभ झाला तो शाळेतील वर्गखोलीतून.. सगळ्यांना भेटून, एकमेकांची ओळख करून आणि चिडवत बसने हा प्रवास सुरू झाला. आपण एकमेकांना ओळखू शकू का, 32 वर्षानंतर एकमेकांशी काय बोलणार अशी शंका काहींना होती. परंतु, हे मित्र भेटले… तेव्हा, 1990 च्या काळामध्ये सर्व परत आले होते. आपण पन्नाशीच्या जवळ आहोत, हे सत्य स्वीकारायला कोणीही तयार नव्हते. प्रत्येकजण अजूनही स्वत:ला तरुण समजून वागत होता. आणि त्यासाठी असलेले कारण म्हणजे त्यांच्यात अस्तित्वात असलेले प्रेम, जिव्हाळा, मैत्री आणि मित्र.
या मेळाव्यानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तिकेत प्रत्येक मित्राचा रक्तगट देण्यात आला असून स्वत;ला किंवा इतर कुणालाही रक्ताची गरज भासल्यास संपर्क करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. याशिवाय नियमितपणे एकत्रित येण्याचा मानस यावेळी करण्यात आला.
यावेळी रविंद्र गुळरांधे, संतोष पिल्लई, अंजली कडू, जयश्री देशमुख, जयंत जुमडे, नरेंद्र झोड, जयंत सातव, गिरीधर उमप, प्रशांत जाजू, गोपाल राऊत, योगेश विटणकर, गोविंद हिरडे, प्रसन्ना महाशब्दे, राजेश रंगारी, अजय वावगे, रोहीनी परांजपे, अपर्णा धानोरकर, सागर पौतारे, शिल्पा राणे, उज्वल खॉंडे, अमोल मावकर, प्रविण मानवटकर, विरंद्र ठाकरे, ज्योती बोंद्रे, अरूणा शेट्ये, माधुरी साठवणे, पुनम झांबरे, शितल बांबल, बेबी आसरे, प्रतिभा लोखंडे, विद्या मावळे, कांचन नेमाडे, सुवर्णा राजपूत, माधुरी चाफ़ेकर, अभिजीत बांबुरीकर, सुधीर पिंपळे आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.