नागपूर :- वीजबिलापोटी ग्राहकांकडे असलेली थकबाकी वसुल करण्यासाठी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी देखील उतरले असून ग्राहकांकडे जाऊन थकबाकीची रक्कम भरण्याचे आवाहन हे अधिकारी करीत आहेत.
वीज ग्राहकांकडे असलेली कोट्यावधी रुपयांची थकबाकी ग्राहकांनी त्वरीत भरून महावितरणला सहकार्य करावे यासाठी महावितरण नागपूरचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, नागपुर ग्रामिणचे अधीक्षक अभियंता राजेश नाईक, सावनेर विभागाच्या कार्यकारी अभियंता दिपाली माडेलवार आणि त्यांच्या सहका-यानी सोमवारी (दि. 30) सावनेर भागातील थकबाकीदार ग्राहकांची भेट घेत त्यांना चालू व थकित वीज बिलाचा भरणा त्वरीत करण्याचे आवाहन केले. यावेळी या अधिका-यांनी थकबाकी पोटी तात्पुरत्या स्वरुपात खंडित करण्यात आलेल्या वीजपुरवठ्याची तपासणी देखील केली. मुख्यालयाने दिलेले संकलन लक्ष्य साध्य करण्याचे निर्देश सुहास रंगारी यांनी यावेळी उपस्थित कर्मचा-यांना दिले. प्रलंबित वीज जोडण्या विहीत मुदतीत मंजूर करुन त्वरीत वीज जोडण्या देण्याचे निर्देश देखील त्यांनी यावेळी दिले. एक्स्प्रेस फिडरचे ऊर्जा अंकेक्षण आणि नादुरुस्त रोहीत्रांचा आढावा देखील यावेळी घेण्यात आला.
ग्राहकांनी त्यांच्याकडील चालू आणि थकीत वीजबिलांच्या नियमित भरणा करून वीजपुरवठा खंडित होण्याची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.