– 2 ऑक्टोंबरपासून जिल्हाभर अभियान राबणार
यवतमाळ :- उत्तम आरोग्यासाठी स्वच्छता फार महत्वाची आहे. स्वच्छतेसाठी गावस्तरावरच नव्हे तर घरस्तरावर देखील उत्तम व्यवस्थापन होणे आवश्यक आहे. जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाच्यावतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून यासाठी दि.2 ऑक्टोंबरपासून घरकुल तेथे शोषखड्डा हे अभियान राबविण्यात येणार आहे. अभियानाच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी नुकताच आढावा घेतली.
बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह पाणी पुरवठा व स्वच्छताचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश नाटकर तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कार्यरत सर्व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहाय्यक व क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर उपस्थित होते. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या घरकुलाच्या कामावर ग्रामीण भागातील स्वच्छतेच्या अनुषंगाने उपयोगी असलेल्या शोषखड्याची कामे घेतल्यास ग्रामीण भागातील सांडपाणी व्यवस्थापन, रोगमुक्त व जलयुक्तगाव ही संकल्पना साध्य होण्यास मदत होणार आहे.
त्या अनुषंगाने दि. २ ऑक्टोबर पासून जिल्ह्यात घरकुल तीथ शोषखडा हे अभियान राबविण्यात येत आहे. अभियानाच्या पूर्वतयारीचा आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतला. आढावा सभेमध्ये प्रकाश नाटकर यांनी घरकुल योजने व्यतिरिक्त सुध्दा ग्रामीण भागातील नागरिकांनी वैयक्तिक शोषखड्डा या कामाचा लाभ घेवून आपले गाव जलयुक्त, आरोग्यदायी करावे. त्याकरिता मग्रारोहयो योजनेतून प्रती वैयक्तिक शोषखड्डा ३ हजार ३९२ रुपये इतका निधी मिळणार असल्याचे सांगितले.
घरकुल तेथे शोषखड्डा या अभियानांतर्गत ग्रामीण भागातील सांडपाण्याचे व्यवस्थापन होवून जलपातळी वाढण्यास मदत होईल. डासमुक्त, रोगमुक्त व जलयुक्त गाव ही संकल्पना साध्य होणार आहे, तसेच नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन करण्याच्यादृष्टीने शोषखड्याची कामे महत्वपूर्ण ठरणार आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी सांगितले.