नागपूर – ज्येष्ठ नागरिकांना सेवानिवृत्त झाल्यानंतर आर्थिक परिस्थितीच्या अभावी चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळत नाहीत . अशा नागरिकांना खासदार हेल्थ कार्डच्या माध्यमातून मदत होईल असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूरमध्ये केले. नागपूरच्या पाचही विधानसभा क्षेत्रातील निवडक पाच अशा एकूण 25 ज्येष्ठ नागरिकांना नितीन गडकरी यांच्या हस्ते खासदार हेल्थ कार्डचे वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी खासदार दत्ता मेघे, नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी, आमदार प्रवीण दटके, कृष्णा खोपडे , मोहन मत उपस्थित होते .
ज्येष्ठ नागरिकांना पॅथोलॉजी रेडिओलॉजी तसेच इतर अत्याधुनिक वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी या कार्डचा उपयोग होणार असून उर्वरित 9 हजार हेल्थ कार्ड संबंधित विधानसभा क्षेत्रातील आमदाराच्या मार्फत वितरित करणार आहेत. खासदार हेल्थ कार्ड करिता नागपुरातील 40 हजार जेष्ठ नागरिकांकडून अर्ज स्वीकारण्यात आले होते. या कार्डच्या माध्यमातून नागपुरातील जेष्ठ नागरिकांना माफक दरात सवलतीमध्ये विविध उपचार नागपुरातील ठराविक 70 रुग्णालयात मिळणार आहे .खासदार हेल्थ कार्डचे ऍप सुद्धा तयार करण्यात आले आहे.
सेवानिवृत्त जेष्ठ नागरिकांची आर्थिक परिस्थिती महागड्या वैद्यकीय सुविधा घेण्यासारखी नसते यामुळे केंद्र सरकारच्या जेष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजनेअंतर्गत मेडिकल उपकरण वितरणाचा कार्यक्रम सुद्धा नागपूरमध्ये लवकरच घेण्यात येईल असेही गडकरी यांनी जाहीर केले. माजी खासदार दत्ता मेघे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेल्या कार्याचे त्यांनी अभिनंदन केलं.