मुंबई :- भारत आणि मलेशियामधील सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी अर्धसंवाहक क्षेत्र हा एक महत्त्वाचा दुवा ठरत आहे, असे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृह येथे मलेशियाचे उपमुख्यमंत्री लिउ चिन तोंग यांनी शिष्टमंडळाणे भेट घेतली. यावेळी पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे उपस्थित होते.
राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल म्हणाले की, मलेशिया हा सेमीकंडक्टर उद्योगात जागतिक स्तरावर अग्रेसर आहे. 1970 च्या दशकातच मलेशियाने या क्षेत्रात वाटचाल सुरू केली. महाराष्ट्र हा देशातील काही मोजक्या राज्यांपैकी एक आहे, जिथे सेमीकंडक्टर उद्योग मोठ्या प्रमाणात विस्तारत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मलेशियन गुंतवणूकदारांचे स्वागत करण्यात येईल.
भारत आणि मलेशियामधील आर्थिक सहकार्याला अधिक गती देण्याबरोबरच सेमीकंडक्टर, औद्योगिक उत्पादन, पुरवठा साखळी, वित्तीय सेवा आणि इतर महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल.
मलेशियाचे उपमुख्यमंत्री म्हणाले की, भारत आणि मलेशियामधील आर्थिक, व्यापार आणि गुंतवणूक संबंध अधिक दृढ करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. भारतासोबत काम करण्याचे आमचे धोरण असून, विशेषतः अर्धसंवाहक (सेमीकंडक्टर) उद्योगाच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तसेच महाराष्ट्रातील या संदर्भातील परिसंस्थेचा विकास करण्यास आम्ही उत्सुक आहोत.
मलेशियाच्या सहभागामुळे अर्धसंवाहक उद्योगास चालना मिळेल, तसेच दोन्ही देशांच्या आर्थिक संबंधांमध्ये संधी निर्माण होतील. महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतासाठी हा उद्योग मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि गुंतवणुकीच्या संधी निर्माण करू शकतो. त्यामुळे दोन्ही देश एकत्र येऊन नव्या आर्थिक विकास करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मलेशियाचे उपमुख्यमंत्री लिउ चिन तोंग यांनी सांगितले.
भारतासोबत सेमीकंडक्टर प्रणालीवर काम करण्याचा आमचा मानस आहे. गेल्या अनेक दशकांपासून भारत आणि मलेशियामधील व्यापारी संबंध दृढ आहेत. गुंतवणूक आणि व्यापार संबंधांचे नूतनीकरण करण्याची आमची इच्छा आहे. परस्पर विकासासाठी एकत्र येण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. भारत जागतिक स्तरावर अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे रोजगार आणि दोन्ही देशांमध्ये संधी उपलब्ध करता येतील, हे पाहण्याचा आमचा प्रयत्न आहे.
जग मोठ्या प्रमाणात बदलले आहे. अशा परिस्थितीत, एकत्र येऊन सहकार्याचे नवे मार्ग शोधण्याची गरज आहे. मलेशियाला भारताच्या विकासाचा भाग व्हायचे आहे, विशेषतः अर्धसंवाहक क्षेत्रात आणि अन्य उद्योगांमध्येही सहकार्य वाढवायचे आहे.
मलेशियाकडे मजबूत पुरवठा साखळी प्रणाली आहे, जी भारतासाठी देखील उपयुक्त ठरू शकते. दोन्ही देश मिळून या क्षेत्रातील महत्त्वाचे बदल घडवू शकतात. मुंबई ही आर्थिक राजधानी असल्याने, येथे उद्योगांसाठी मोठी संधी असल्याची माहिती यांवेळी देण्यात आली.