ओबीसींच्या कल्याणासाठी आवाज उचलल्याबद्दल मला काँग्रेस नेत्यांनी पक्षातून काढले. – डॉ. आशिष र. देशमुख

नागपूर :- महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांच्यातर्फे दि. २४ मे २०२३ ला कॉंग्रेसचे डॉ. आशिष र. देशमुख (माजी आमदार, नागपूर, महाराष्ट्र) यांना कॉंग्रेस पक्षातून निष्कासित करण्यात येत असल्याचे पत्र प्राप्त झाले.

राहुल गांधी यांच्या एका विधानामुळे संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान होत असेल आणि त्यामुळे संपूर्ण ओबीसी समाज दुखावला गेला असेल तर कॉंग्रेसच्या हितासाठी राहुल यानी भारतातील एकूण लोकसंख्येच्या ५४% असलेल्या ओबीसी समाजाची माफी मागून हा विषय इथेच संपवायला पाहिजे. ओबीसी समाज दुखावल्यास त्याचा परिणाम कॉंग्रेसला मतदानाच्या स्वरूपात भोगावा लागेल, अशी रास्त सूचना केल्यामुळे डॉ. आशिष र. देशमुख यांना कॉंग्रेस पक्षातून ६ वर्षांसाठी निष्कासित करण्यात आले आहे. त्यावर डॉ. आशिष  र. देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

डॉ. आशिष र. देशमुख म्हणाले, “निष्कासनाचा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे. ही कारवाई म्हणजे महाराष्ट्र काँग्रेसचे नेतृत्व चुकीच्या लोकांकडे असल्याचे द्योतक आहे. ओबीसींच्या कल्याणासाठी आवाज उचलल्याबद्दल मला काँग्रेस नेत्यांनी पक्षातून काढले. मला त्यांनी कारणे दाखवा नोटिस दिला होता. त्यावर मी सविस्तर उत्तर दिले होते. महाराष्ट्रासह देशभरातील माध्यमांनी माझे उत्तर सविस्तर प्रसिद्ध केले. त्यात काही तथ्य होते म्हणूनच त्याला एवढी प्रसिद्धी मिळाली. मात्र, माझे उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांना समाधानकारक वाटत नाही, एवढेच कारण त्यांनी निष्कासनासाठी दाखविले आहे. याचा अर्थ मला पक्षातून काढण्याचे आधीच ठरले होते आणि नोटिस नंतर दिला गेला, असाही काढता येतो. काँग्रेसने देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान दिले. काँग्रेसच्या नेत्यांनी भारताच्या लोकशाहीसाठी, एकात्मतेसाठी बलिदान दिले. महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते मात्र स्वातंत्र्य, लोकशाही असे काहीही मानत नाहीत. त्यांना जो आवडत नाही, त्याला ते दूर करतात. मी ओबीसींच्या प्रश्नांवर आवाज उचलत असल्यामुळे स्वतःला ओबीसी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रातील अनेक काँग्रेस नेत्यांची अडचण होत होती. आशिष देशमुखांचे पक्षातील वजन वाढले तर आपले वजन कमी होईल, असे या दुकानदार नेत्यांना वाटत होते. माझा गुन्हा कोणता, हे त्यांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही. राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाची माफी मागावी, अशी सूचना मी केली. काँग्रेस हा लोकशाहीवादी पक्ष असेल तर ही सूचना लोकतांत्रिक आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांना त्यांचा पक्ष लोकशाहीवादी नसल्याचे सिद्ध करण्याची घाई झालेली दिसते.

माझे वडील काँग्रेसमध्ये आहेत हे खरे आहे. त्यांनी प्रदेशाध्यक्षपद व मंत्रिपदे भूषविली. त्यामुळे माझा ओढा त्या पक्षाकडे असणे स्वाभाविक होते. पण, काँग्रेसमध्ये डोके आणि वाणी वापरणारे लोकं चालत नाहीत, असे माझ्या लक्षात आले तेव्हा मी त्या पक्षापासून दूर झालो. 2014 मध्ये भाजपाकडून निवडणूक लढलो व जिंकलो. पण, काँग्रेसबद्दलची आस्था संपलेली नव्हती. त्यामुळे राहुल, सोनिया गांधी यांच्याशी बोलून मी पुन्हा काँग्रेसमध्ये आलो. काँग्रेससाठी आमदारकी सोडणारा मी एकमेव आहे. ओबीसींसाठी मला काम करायचे आहे, असे मी त्यांना पक्षात परत येताना म्हणालो होतो आणि त्यांनी काँग्रेसमध्ये राहून तुम्हाला ते करता येईल, असे म्हटले होते. पण, महाराष्ट्रातील नेत्यांनी श्रेष्ठींच्या भावनेची किंवा काँग्रेस पक्षाच्या भविष्यासाठी आवश्यक असलेल्या मुद्यांची देखील दखल घेतली नाही.

काँग्रेसमध्ये परतल्यावर मला सातत्याने डावलले गेले. काँग्रेसमध्ये ओबीसी समाजाचे जे प्रस्थापित नेते आहेत, त्यांची मानसिकता उच्चवर्णीयांसारखी झाली आहे. त्यांना ओबीसींचे खरे प्रश्न हाताळण्यापेक्षा ओबीसींच्या मतांशी देणेघेणे आहे. मात्र, ओबीसी लोकांनी काँग्रेसचा कावा ओळखला आहे. एकेकाळी काँग्रेसचा बेस असलेला ओबीसी मतदार काँग्रेसपासून दूर गेला असून, काँग्रेसच्या घसरणीचे ते प्रमुख कारण आहे. मात्र, यातून कोणताही बोध घेण्यास काँग्रेसचे नेते तयार नाहीत. भविष्यात मला ओबीसींच्या, शेतकऱ्यांच्या व युवकांच्या प्रश्नांवर काम करायचे आहे. कोणत्या पक्षात जायचे, याचा निर्णय घेतलेला नाही. योग्यवेळी सर्वांना कळेल. मी कुण्या नेत्याकडे गेलो किंवा माझ्याकडे कुणी आले म्हणजे मी त्यांच्या पक्षात जाणार, असा अर्थ काढण्याची घाई करू नका. राजकारणाच्या पलिकडे देखील काही संबंध असतात आणि ते जपावे लागतात. एकमेकांवर टीकाटिप्पणी करून देखील मैत्री भाव जपण्याची राजकारणातल्या बऱ्याच लोकांमध्ये पद्धत आहे. दुर्दैव असे की, महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांमध्ये ही दिलदारी नाही. त्यांना त्यांच्यावरची टीका आवडत नाही. ओबीसींच्या मुद्यांवर मी आवाज उचलला तर ते देखील आवडत नाही. मी लोकतांत्रिक पद्धतीने काही मुद्दा मांडला तर ते देखील आवडत नाही. थोडक्यात त्यांना आशिष देशमुख आवडत नाही. कारण आशिष देशमुख हा ओबीसींचा खरा प्रतिनिधी आहे, हे त्यांना माहिती आहे आणि तो आपल्याला वरचढ होऊ शकतो हेही त्यांना माहिती आहे.

या कारवाईच्या विरोधात काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांकडे दाद मागण्यात काही अर्थ आहे, असे वाटत नाही. त्यांची देखील महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी दिशाभूल करून ठेवली आहे. ज्या ओबीसी समुदायाच्या पाठिंब्यावर ज्या काँग्रेसने या देशात सहा दशकांहून अधिक काळ राज्य केले, त्या ओबीसींशी आता काँग्रेसची कोणतीच बांधिलकी नाही, हे दुःखदायक आहे. एक ऐतिहासिक सत्य काँग्रेसचे नेते विसरत आहेत. राहुल गांधी यांनी ओबीसी समुदायाचा अवमान केला, हा जो आरोप त्यांच्यावर लागला, ती अलिकडची गोष्ट आहे. मंडल आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्नशील असलेले तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांना राहुल यानचे पिताश्री राजीव गांधी यांनी विरोध केला होता. 1990 च्या आसपासची ही घटना आहे. काँग्रेसचा ओबीसी जनाधार तेव्हापासून वेगाने कमी झाला. आणि आज त्या काँग्रेस पक्षाची दयनीय अवस्था झालेली आहे. ओबीसी समाजाची माफी मागून राहुल याना ताजा विषय संपविता आला असता आणि त्यांच्या पिताश्रींनी केलेली ऐतिहासिक चूक देखील काही प्रमाणात दुरुस्त करता आली असती. ओबीसी समुदायाशी नाळ तोडणे हे भारताच्या आत्मतत्त्वाशी नाळ तोडण्यासारखे आहे. काँग्रेसची पिछेहाट त्यामुळेच सुरू आहे. काँग्रेसने आपल्या मूळ जनाधाराशी पुन्हा संबंध प्रस्थापित करावेत, असे मला वाटले. त्यामुळे मी राहुल याना ओबीसींची माफी मागण्याची सूचना केली तर मलाच पक्षातून काढून टाकले. ओबीसी समुदायाशी असलेली नाळ तोडल्यामुळे काँग्रेसच्या सत्तेला ग्रहण लागले. त्यानंतर परिस्थिती इतकी बदलली की, केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये काँग्रेसची विरोधी बाकावरची उपस्थिती देखील जेमतेम शिल्लक राहिलेली आहे. कारण काँग्रेसची जागा प्रादेशिक पक्षांनी घेतलेली आहे.”

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गोवा में होनेवाली ‘सी-20 परिषद’की जानकारी पुस्तिका का मुख्यमंत्री प्रमोद सावंत के हस्तों प्रकाशन !

Thu May 25 , 2023
पणजी :-27 मई को वास्को, गोवा में पहली बार हो रही ‘सी-20 परिषद’की जानकारी पुस्तिका (Information Booklet ) का गोवा राज्य के मुख्यमंत्री प्रमोद सावंत के हस्तों पणजी में उनके शासकीय निवासस्थान पर प्रकाशन किया गया । इस अवसर पर ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’के शोधन समन्वयक श्वेता, डॉ.अमृता देशमाने एवं व्यावसायिक नारायण नाडकर्णी उपस्थित थे । मुख्यमंत्री के पणजी स्थित शासकीय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com