मनपाने केला कर्तृत्ववान महिलांचा सत्कार
स्वरोजगार करणाऱ्या महिलांना ५ लक्ष २५ हजार रुपये अनुदान
चंद्रपूर :- जीवनातील उद्दीष्टाकडे आत्मविश्वासाने पाऊले टाकुन उद्दिष्ट गाठण्याचा सतत प्रयत्न केला तर आयुष्यात यशस्वी होण्यापासुन तुम्हाला कोणीही थांबवू शकत नसल्याचे प्रतिपादन इंटरनॅशनल मोटीव्हेशनल स्पीकर सोनिया जाडाजी यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे आयोजीत बचतगटातील महिलांसाठी सत्कार, मार्गदर्शन व महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. आपल्या सर्व महिलांमध्ये मोठी क्षमता आहे,त्यांनी ठरविले तर त्या सर्व गोष्टी करू शकतात. अपघातात पाय गमावल्यावर सुद्धा अरुणीमा सिन्हाने एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत केले,पतीच्या उपचारासाठी पैसे नसणाऱ्या ६८ वर्षीय लता भगवान करे या अनवाणी पायाने मॅरेथॉन जिंकतात.अशी अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. आत्मविश्वास ठेऊन कार्य केले तर नक्कीच यशस्वी होता येत असल्याचे त्यांनी माईंड पावर सेमिनार कार्यक्रमात सांगीतले.
जागतिक महिला दिनानिमित्त सकाळी ७ ते १० या वेळेत आझाद गार्डन येथे महिलांसाठी विविध स्पर्धा व मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यात मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग लाभला. याप्रसंगी विजेत्या जयश्री साखरकर,रंजना गोवर्धन यांना स्वच्छतेची पैठणी तर दीपा कानल झाडे यांना विशेष बक्षीस देण्यात आले.त्याचप्रमाणे इतर स्पर्धकांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली.याप्रसंगी आयुक्त यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन वॉर्ड सखींचा सत्कार करण्यात आला.
दुपारी ४ वाजता बचतगटातील महिलांसाठी धनादेश वाटप, आशा वर्कर,विविध क्षेत्रातील कर्तृत्वान महिला यांचा सत्कार कार्यक्रम मनपा वाहनतळ क्षेत्रात घेण्यात आला.बॉल बॅडमिंटनची आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडु मेघा डुकरे,राष्ट्रीय स्तरावरील खो खो खेळाडु शबाना सय्यद व जय्यत खान,वुशू व बॉक्सिंग खेळात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चंद्रपूरचे नाव उंचावणारी प्रीती बोरकर तसेच चामोर्शी येथील मा.न्यायाधीश दीक्षा विघ्ने व गडचिरोली येथील मा.न्यायाधीश निकिशा पठाण यांचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला.
डॉ. कल्पना गुलवाडे,डॉ.प्रियांका असवार, डॉ. नबा शिवजी,डॉ. वर्षा रामटेके, डॉ. मानसी बुरुले या आयर्न लेडी पुरस्कार प्राप्त कर्तृत्वान महिलांचाही सत्कार याप्रसंगी करण्यात आला. महिला सक्षमीकरण अंतर्गत वैयक्तीक स्वरोजगार करणाऱ्या महिलांना बँकेकडुन प्राप्त कर्जावर २५ टक्के किंवा ज्यास्तीत ज्यास्त २५ हजार अनुदान मनपातर्फे देण्यात येते.याप्रसंगी वैयक्तीक स्वरोजगार करणाऱ्या २५ महिलांना एकुण ५ लक्ष २५ हजार रुपये अनुदान धनादेशाद्वारे देण्यात आले.
या प्रसंगी आयुक्त व प्रशासक विपीन पालीवाल,उपायुक्त अशोक गराटे, माजी महापौर संगीता अमृतकर,अंजली घोटेकर,राखी कंचर्लावार, सहायक आयुक्त विद्या पाटील,डॉ. वनिता गर्गेलवार,रफीक शेख,रोशनी तपासे,चिंतेश्वर मेश्राम उपस्थीत होते.