– प्रियांक खर्गे च्या विरोधात भाजपा तर्फे राज्यभर आंदोलन
मुंबई :- स्वातंत्र्यवीर सावरकरांचा काँग्रेसकडून वारंवार अपमान होत असताना उद्धव ठाकरे हे गप्प बसून आहेत. काँग्रेसकडून सावरकरांचा केला जाणारा अपमान उद्धव ठाकरेंना मान्य आहे का, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी नागपूर येथे केला. कर्नाटकातील काँग्रेस सरकारचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी केलेल्या सावरकरांच्या अवमानाच्या विरोधात नागपूर येथे भाजपातर्फे झालेल्या आंदोलनावेळी बावनकुळे बोलत होते. भाजपा व महाराष्ट्रातील जनता सावरकरांचा अपमान कदापि सहन करणार नाही. प्रियांक खर्गे यांनी त्वरित आपले विधान मागे घेत जाहीर माफी मागावी, अशी मागणीही बावनकुळे यांनी यावेळी केली.
बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे हे स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवून घेतात. मात्र खर्गे यांनी सावरकरांचा एवढा अपमान करूनही उद्धव ठाकरे गप्प आहेत. त्यांना सावरकरांचा, हिंदुत्वाचा हा अपमान मान्य आहे का याबाबत त्यांनी स्पष्ट भूमिका महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडावी.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणारे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे यांच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात आले. अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी प्रियांक खर्गे यांचा पुतळा जाळून आपला संताप व्यक्त केला. मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयासमोर, दादर स्थानका बाहेर, बोरीवली येथील सावरकर उद्यान, ठाणे ,पुणे , सोलापूर, छत्रपती संभाजीनगर , नाशिक, धुळे, अशा अनेक ठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांनी आंदोलन करत खर्गे यांचा तीव्र निषेध केला.
काही ठिकाणी प्रियांक खर्गे यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून पुतळा दहन करण्यात आला. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो, हिंदू संघटक सावरकर का अपमान नहीं सहेगा हिंदुस्थान, प्रियांक खर्गे मुर्दाबाद, भारतमाता की जय आदी घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी वातावरण दणाणून टाकले. काही ठिकाणी वीर सावरकरांचा अपमान, उबाठा सेनेची साथ असे फलक हाती घेत उद्धव ठाकरे यांचा देखील निषेध करण्यात आला.