नागपूर :- स्व. बाबुराव वंजारी यांनी समाजाच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. त्यांच्या मनमिळावू वृत्तीमुळे ते सर्वच पक्षांमध्ये आणि सर्व विचारांच्या संघटनांमध्ये लोकप्रिय होते, या शब्दांत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्व. बाबुराव वंजारी यांना श्रद्धांजली अर्पण केली.
नागपूर जिल्हा तेली समाज सभेच्या वतीने सोमवारी क्वार्टर येथील संताजी सभागृहात श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली. यावेळी आमदार कृष्णा खोपडे, आमदार अभिजित वंजारी, आमदार टेकचंद सावरकर, गिरीश पांडव, विजया मारोतकर यांची उपस्थिती होती. ना. गडकरी म्हणाले, ‘बाबुराव वंजारी यांच्यासोबत माझा ४५ वर्षांचा स्नेह होता. सामाजिक व राजकीय जीवनात काम करण्याचे अनेक प्रसंग आले. त्यांच्यातील लोकसंग्राहक मला विशेष वाटायचा. लोकांच्या संकटकाळात धावून जाण्यासाठी ते सदैव तत्पर असत. समाजात एकमेकांसोबत ज्यांचे पटत नव्हते त्यांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी ते प्रयत्नशील असायचे.’ यावेळी ना. नितीन गडकरी यांनी स्व. बाबुराव वंजारी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.