-विद्यापीठ रोजगार व प्रशिक्षण सेलचा उपक्रम
नागपूर :- बौद्धिक संपदा कायदा अंतर्गत सर्व प्रकारच्या सेवा देणाऱ्या नामवंत लीगल फोर्स आरएपीसी या कंपनीत सात विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रोजगार व प्रशिक्षण सेल मार्फत घेण्यात आलेल्या कॅम्पस ड्राईव्हमुळे या विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील या कंपनीमध्ये कार्य करण्याची सुसंधी लाभली आहे.
बौद्धिक संपदा कायदा, ट्रेडमार्क, कॉपीराईट, पेटंट आधी विविध क्षेत्रांमध्ये जागतिक स्तरावर विधी सेवा पुरविण्याचे काम लीगल फोर्स कंपनी करीत आहे. माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली रोजगार व प्रशिक्षण सेलच्या वतीने विधी क्षेत्रातील विद्यार्थ्यांकरिता कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. लीगल फोर्स आरएपीसी (वर्ल्ड वाईड पी.सी.) आयटी पार्क, नागपूर येथील या कंपनीने लीगल असिस्टंट या पदाकरिता मुलाखतीचे आयोजन केले होते. लीगल असिस्टंट या पदाकरिता विद्यापीठ रोजगार व प्रशिक्षण सेल मार्फत ७० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. कंपनीकडून घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षेत २० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामधून मुलाखतीनंतर सात विद्यार्थ्यांची लीगल असिस्टंट या पदावर नियुक्ती करण्यात आली. लीगल फोर्स आरएपीसी कंपनीचे संचालक विवेक गोडबोले, मॅनेजर अक्षय मेहेत्रे, विद्यापीठाचे रोजगार व प्रशिक्षण अधिकारी डॉ. भूषण महाजन यांच्या उपस्थितीत मुलाखत प्रक्रिया पार पडली.
मुलाखत प्रक्रिया यशस्वी करण्याकरिता लीगल फोर्स कंपनीतील भूषण राऊत, निकिता छतानी, प्रियंका काटकमवार, नमिता चौकीकर, अंकिता मिश्रा यांच्या पथकाने प्रयत्न केले. कंपनीचे मुख्य कार्यालय कॅलिफोर्निया येथे असून दुसरे कार्यालय टेम्प्टे एरिझोरा येथे आहे. एकूण १८० देशांमध्ये लीगल फोर्स कंपनी बौद्धिक संपदा कायदा विषयक सेवा देते. जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या कंपनीमध्ये विद्यार्थ्यांची निवड झाल्याने त्यांचे माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, रोजगार व प्रशिक्षण अधिकारी डॉ. भूषण महाजन यांनी कौतुक केले आहे.