– जलसंवर्धनासाठी मनपाचे प्रयत्न,जलमित्रांची नोंदणी सुरु
चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे रेन वॉटर हार्वेस्टींगची जनजागृती करण्यास स्वेच्छेने काम करणाऱ्या १७ जलमित्रांची निवड करण्यात आली असुन सर्व जलमित्रांना त्यांचे नियुक्ती पत्र २४ मे रोजी मनपा सभागृहात झालेल्या कार्यक्रमात आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या हस्ते देण्यात आले.
रेन वॉटर हार्वेस्टींगची जनजागृती करण्यास स्वेच्छेने काम करणारे जलमित्र मनपाद्वारे नेमले जात आहेत.जलमित्र म्हणुन काम करतांना त्यांच्या वॉर्ड मध्ये जनजागृती करून परीसरातील घरांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टींग करून उत्कृष्ट काम करणाऱ्यांना पुरस्कृत केले जाणार आहे. जलमित्राच्या प्रयत्नांनी त्यांच्या परिसरात ११ घरी रेन वॉटर हार्वेस्टींग केल्यास जलमित्र, २१ घरी केल्यास सिल्वर जलमित्र,५१ घरी केल्यास गोल्डन, ७१ घरी केल्यास डायमंड तर १०१ घरी रेन वॉटर हार्वेस्टींग केल्यास नगर जलमित्र या पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात डॉ. स्नेहल पोटदुखे, अँड. आशिष मुंदडा, अमोल पोटुर्डे,प्रणाली कोल्हेकर,गणेश झाले,शशिकांत म्हस्के, धनराज कोवे,मनीषा कन्नमवार,सारीका भुते,हरीदास नागापुरे, किरण तुरणकर,सविता धुमने,रीना मोगरे,बंडु देवोजवार,पूजा पडोळे,अर्चना चहारे,उमेश आष्टणकर या १७ स्वयंसेवकांना स्वेच्छेने जलमित्र म्हणुन काम करीत असल्याचे नियुक्तीपत्र देण्यात आले. या जलमित्रांनी स्वतः रेन वॉटर हार्वेस्टींग केले असुन इतरांनाही रेन वॉटर हार्वेस्टींग करण्यास प्रेरीत करत आहेत.याप्रसंगी इको प्रो संस्थेचे संस्थापक बंडु धोत्रे यांची विशेष उपस्थीती होती व त्यांनी मार्गदर्शन देखील केले. पावसाद्वारे मिळणारे पाणी वाचविण्यास प्रत्येक घरी रेन वॉटर हार्वेस्टींग केले जावे यासाठी चंद्रपूर महानगरपालिका प्रयत्नशील आहे. हार्वेस्टींग करण्यास मनपातर्फे घराच्या छताच्या क्षेत्रफळानुसार ५,७ व १० हजार रुपये अनुदान दिले जाते तसेच पुढील ३ वर्षे मालमत्ता करात २ टक्के सूट सुद्धा देण्यात येते तसेच नविन बांधकाम करण्यास परवानगी घेणाऱ्या बांधकामधारकांना रेन वॉटर हार्वेस्टींग करणे सक्तीचे केले गेले आहे.बोरवेल धारकांना रेन वॉटर हार्वेस्टींग करणे अनिवार्य करण्यात आले असुन न केल्यास त्यांना दंड ठोठावण्यात येत आहे. रेन वॉटर हार्वेस्टींगसाठी विविध माध्यमातुन जनजागृती सुद्धा करण्यात येत आहे.
अधिकाधिक नागरीकांनी जलमित्र म्हणुन काम करण्यास नोंदणी करावी व अधिक माहीतीसाठी ९०७५७५१७९० या क्रमांकावर अथवा मनपा रेन वॉटर हार्वेस्टींग कक्षात संपर्क साधण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.