गडचिरोली :- ६८-गडचिरोली या अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या विधानसभा मतदार संघाची दिनांक २० नोव्हेंबर रोजी होणारी निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी १ हजार ६०६ कर्मचाऱ्यांचे १३ व १४ नोव्हेंबर रोजी ईव्हीएम यंत्र हाताळण्याच्या प्रात्यक्षिकासह मतदान प्रक्रिया संबंधीचे दुसरे प्रशिक्षण येथील गोकुळ नगरातील शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात पार पडले.या प्रशिक्षणास गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे सामान्य निवडणूक निरीक्षक राजेंद्र कुमार कटारा (भाप्रसे) यांनी भेट देऊन पाहणी केली व प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुल कुमार मीना यांच्या नियंत्रणाखाली सदर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. ६८-गडचिरोली विधानसभा क्षेत्रात गडचिरोली, धानोरा व चामोर्शी या तीन तालुक्यांचा समावेश आहे.गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ३६२ मतदान केंद्र असून ४०३ पथक नेमलेले आहेत. यातील ४१ पथक राखीव आहेत.एकूण १ हजार ६०६ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.यात ३८७ केंद्राध्यक्ष,३९३ सहाय्यक मतदान अधिकारी व ८२६ इतर मतदान अधिकारी यांचा समावेश आहे.
प्रशिक्षणात कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट व व्हीव्हीपॅट यंत्र हाताळण्याचे कौशल्य समजावून सांगण्यात आले.यावेळी मतदान प्रक्रिया संबंधी कर्तव्य व जबाबदाऱ्यांची जाणीव प्रशिक्षणात करून देण्यात आली. मतदानाच्या पूर्व तयारीसह मतदान युनिट तयार करण्यापासून ते संपूर्ण मतदान प्रक्रियेसंबधी,मतदानाची गुप्तता, सुरक्षा व आचारसंहिता बाबत विस्तृत माहिती देण्यात आली.प्रशिक्षणार्थींच्या शंका व प्रश्नांचे निराकरण करण्यात आले.
प्रशिक्षण स्थळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुल कुमार मीना यांच्यासह सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी (चामोर्शी ) अमित रंजन यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. यावेळी गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार संतोष आष्टीकर, धानोराचे तहसीलदार अविनाश शेंबटवाड,चामोर्शीचे तहसीलदार प्रशांत घोरूडे , नायब तहसीलदार अमोल गव्हारे, नायब तहसीलदार हेमंत मोहरे, नायब तहसीलदार चंदू प्रधान, संपर्क अधिकारी तथा उपविभागीय अभियंता संजय भांडारकर ,सहाय्यक प्रकल्प अधिकारी वहीद शेख,अनिल सोमनकर,महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.