राष्ट्रीय पर्यावरण संशोधन अभियांत्रिकी संस्था – नीरीच्या वतीने आयोजित ‘वन वीक वन लॅब ‘ या संपर्क कार्यक्रमाचे उद्घाटन
नागपूर :-वैज्ञानिक हे नेहमी संशोधनामध्ये शाश्वत विकासाचा पुरस्कार करतात. मात्र या शाश्वत संशोधनाला जर किफायतशरपणा किंवा सहज उपलब्धता नसेल तर ते संशोधन सामान्य जनतेसाठी व्यवहार्य नसते. त्यामुळे वैज्ञानिकांनी आपल्या संशोधनामध्ये किफायतशीरपणा हा घटक प्रामुख्याने समाविष्ट करावा असे आवाहन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव एस. चंद्रशेखर यांनी आज केले .
नागपूरच्या वर्धा रोड स्थित वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद -सी एस आय आर च्या अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय पर्यावरण संशोधन अभियांत्रिकी संस्था – नीरीच्या वतीने आयोजित ‘वन वीक वन लॅब ‘ या आज 8 एप्रिल पासून ते 13 एप्रिल दरम्यान चालणाऱ्या संपर्क कार्यक्रमाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते . याप्रसंगी निरीचे संचालक डॉ .अतुल वैद्य प्रामुख्याने उपस्थित होते .
आज कृत्रिम बुद्धिमत्ता ,मशीन लर्निंग ,चॅट -जीपीटी यासारख्या तंत्रज्ञानाने वैज्ञानिक समुदायासमोर एक आव्हान उभे केले असून वैज्ञानिक समुदायाने अशा तंत्रज्ञानाचा मानव जातीवर पडणाऱ्या परिणामांवर किंवा त्यांच्या गैरवापरावर सतर्क राहून याबाबत अधिक संशोधन करणे गरजेचे आहे असे चंद्रशेखर यांनी सांगितले . विज्ञानामध्ये नैतिकता ही सर्वात महत्त्वाची असते असे सांगून आज समाज माध्यमावर विज्ञान तंत्रज्ञानाच्या विषयी पसरणाऱ्या गैरसमज तसेच चुकीच्या माहिती संदर्भात देखील वैज्ञानिकांनी दक्ष राहून त्यासंदर्भात प्रबोधन करणे आवश्यक आहे असे त्यांनी याप्रसंगी स्पष्ट केले .
‘वन वीक वन लॅब ‘ हा कार्यक्रम केवळ आठवडाभराचा नसून ही निरंतर चालणारी प्रक्रिया असली पाहिजे . वैज्ञानिकांनी आपल्या वेळातून काही वेळ काढून शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांना विज्ञान त्यांच्या आयुष्यात कसे बदल घडवून आणू शकते याबाबत सुद्धा प्रबोधन केले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले . विज्ञानाची उत्तरोत्तर वाढ होत जाणार असून 40 वर्षात ते एकंदरीत पूर्ण परिवर्तन झालेले असेल . त्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञान हे भविष्यातील दृष्टीने कसे समर्पक राहील याचा देखील विचार वैज्ञानिकांनी केला पाहिजे त्यांनी नमूद केले.
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाद्वारे सी एस आय आर च्या अंतर्गत येणाऱ्या सर्व संस्थांना निधी पुरवल्या जात असून नीरी संस्थेने पर्यावरण तसेच नेट झिरो कार्बन उत्सर्जनामध्ये प्रामुख्याने हातभार लावला पाहिजे असे आवाहन देखील त्यांनी केले.
यावेळी प्रास्ताविकपर भाषणात संस्थेचे संचालक डॉ . अतुल वैद्य यांनी निरीच्या संशोधन कार्याबाबत उपस्थितांना माहिती दिली . ‘वन वीक वन लॅब ‘ या उपक्रमाचा उद्देश हा पर्यावरणाशी संबंधित सर्व हितधारकांची संवाद साधून उद्योग , समाज यांच्या पर्यावरणविषयक गरजा जाणून घेणे हा आहे , असे त्यांनी सांगितले .
यावेळी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. एस. चंद्रशेखर यांनी विदर्भातील वातावरणातील बदलांबाबत तसेच औष्णिक ऊर्जा प्रकल्पांच्या प्रभावांचा अभ्यास करण्यासाठी निर्मित सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटनही केले .
याप्रसंगी निरीच्या वैज्ञानिक डॉ. साधना रायलू यांनी निरीच्या पर्यावरणीय बदल केंद्राबद्दल माहिती दिली. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाव्दारे पुरस्कृत या केंद्राद्वारे प्रामुख्याने विदर्भातील औष्णिक केंद्रात निघणाऱ्या प्रदूषणाचे हवामानात होणारे बदल यामध्ये संशोधन होणार असल्याची त्यांनी सांगितलं . या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन सुद्धा डॉ. रायलू यांनी केलं.
याप्रसंगी निरीच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . 8 ते 13 एप्रिल दरम्यान आयोजित वन वीक वन लॅब या उपक्रमाअंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
आजच्या उद्घाटन सत्रानंतर महिला सक्षमीकरण,शाश्वत विकासाकरिता हरित विकास या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले .
9 एप्रिल रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 4.30 दरम्यान लोकसंपर्क कार्यक्रमादरम्यान सामान्य जनतेला नीरीचे संधोधन कार्य, प्रयोगशाळा भेटीच्या माध्यमातून बघायला मिळणार असून पथनाट्य आणि नाटक प्रस्तुतीद्वारे नीरीची पर्यावरणाबद्दल भूमिका स्पष्ट देखील होणार आहे.
10 एप्रिल रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 4.30 दरम्यान ग्रामीण तसेच वनाशी संबंधित ग्रामस्थ यांच्यासोबत चर्चासत्राचे आयोजन होईल. 11 एप्रिलला सकाळी 10.30 ते दुपारी 3.30 दरम्यान विद्यार्थी संपर्क कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी-वैज्ञानिक संवाद,व्याख्यान,विज्ञान स्पर्धा यासारखे उपक्रम होतील.
देशाच्या हरित विकास योजनेचा एक भाग म्हणून एमएसएमई क्षेत्र,उद्योग यांच्याशी सहकार्य, आणि विविध पर्यावरणीय समस्यांचे निराकरण करण्याचा हेतूने 12 एप्रिल रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 4.30 दरम्यान उद्योग आणि एमएसएमई बैठक होणार आहे.
घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन या पर्यावरण तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान संदर्भात असणाऱ्या मुद्द्यांवर स्थानिक स्वराज्य संस्थांना पर्यावरणीय उपाय शासकीय स्तरावर प्रत्यक्ष अंमलात आणण्यासाठी बैठकीचे आयोजनही 13 एप्रिलला सकाळी 10.30 ते दुपारी 3.30 दरम्यान करण्यात येईल .
समाज आणि विविध भागधारकांपर्यंत पोहोचण्यासाठी आठवडाभर आयोजित या कार्यक्रमाचा समारोप 13 एप्रिल रोजी सायंकाळी 4.30 वाजता होणार असून यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात येणार आहे.