रस्ता सुरक्षा सप्ताहाचा समारोप
नागपूर : शालेय जीवनात बालमनावर संस्कार घडतात याच काळात विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन मिळाल्यास रस्ते अपघातांची संख्या कमी होण्यास मदत होईल. म्हणूनच शाळांमधून वाहतूक नियमांचे मार्गदर्शन मिळावे, अशा भावना आज शिक्षणाधिकारी रविंद्र काटोलकर यांनी येथे व्यक्त केल्या.
जिल्ह्यात 11 जानेवारी पासून राबविण्यात येत असलेल्या रस्ता सुरक्षा सप्ताहाचा समारोप आज कविवर्य सुरेश भट सभागृहात पार पडला. यावेळी काटोलकर बोलत होते. वाहतूक शाखेच्या उपायुक्त चेतना तिडके, शिक्षणाधिकारी माध्यमिक रविंद्र काटोलकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक श्रीकांत गभने, प्रादेशिक परिवहन अधिकारी(शहर) रविंद्र भुयार, प्रादेशिक परिवहन अधिकारी(ग्रामीण) विजय चव्हाण उपस्थित होते.
काटोलकर म्हणाले, 15 ते 25 वयोगटातील व्यक्ती अपघातात मृत्युमुखी पडल्याचे आढळून आले असून त्यासाठी शाळेत परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे. त्यासोबतच अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्त व्यक्तींना योग्य मदत मिळाल्यास त्यांचे प्राण वाचू शकतात. शालेय विद्यार्थ्यांना संस्कारक्षम वयात संस्कार घडविल्यास संवेदनक्षम नागरिक घडू शकतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
निवृत्ती राठोड यांनी सांगितले, वाहनचालकाने मद्य घेऊन वाहन चालवू नये त्यामुळेच अनेक अपघात होतात. वाहतूक नियमांचे पालन करणे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य असून त्यामुळे अपघात कमी होतील. अपघात कमी झाल्यास रुग्णालयावर होणारा ताण कमी होईल असे त्यांनी सांगितले. परिवहन विभागाने शिबीराचे आयोजन केल्यास आरोग्य विभागाचे त्यास नेहमी सहकार्य लाभेल.वाहनचालकांनी आरोग्याची नियमित संपूर्ण आरोगय तपासणी करावी, असे राठोड म्हणाले .
प्रस्ताविकात विजय चव्हाण यांनी रस्ते सुरक्षा सप्ताहांतर्गत ‘रस्ता सुरक्षा जीवन सुरक्षा’ या ब्रिदाप्रमाणे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. सहाय्यक प्रादेशिक अधिकारी समीर शेख यांनी ‘रोड रेस गेम’ बद्दल माहिती दिली. यावेळी वाहतूक उपायुक्त चेतना तिडके, विभागीय नियंत्रक श्रीकांत गभने, परिवहन अधिकारी रविंद्र भुयार यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाली. वाहन चालकांचा सत्कार
अपघात विरहित अनेक वर्ष सेवा राज्य परिवहन महामंडळाच्या वाहन चालकांनी दिली. त्याबद्दल मान्यवरांचे स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देवून सत्कार देण्यात आला. तसेच जनआक्रोश, रोड मार्क,जनजागरण आदी संस्थांचा सत्कार करण्यात आला.
सूत्रसंचालन कांचन देशपांडे यांनी केले. वाहनचालक, वाहतूक संबंधी संस्था, वाहतूक विभागाचे पोलीस अधिकारी, कर्मचारी व नागरिक, महिला व विद्यार्थी उपस्थित होते.