– बारावीच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
– उमरेड आगार व्यवस्थापकाचे दुर्लक्ष
बेला :- दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे बंद करण्यात आलेली पहाटेची नागपूर बेला मार्गे उमरेड बस फेरी शाळा सुरू झाल्यानंतरही अद्याप सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे बेला येथील शाळेला येणारे सोनेगाव, आष्टा व दहेलीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यामध्ये विशेष करून बारावीला असणाऱ्या 30-40 ग्रामीण मुला मुलींची अपरिमित शैक्षणिक हानी होत आहे. ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतरही उमरेड आगार व्यवस्थापक लक्ष देण्यास तयार नाही.
लोकजीवन कनिष्ठ महाविद्यालय व विमलताई तिडके कनिष्ठ महाविद्यालयात खेड्यापाड्यातील असंख्य विद्यार्थी शिक्षण घेतात. अकरावी व बारावीचे वर्ग सकाळी 7 वाजता पासन सुरू होतात. त्यामुळे खेड्यातील मुलांना पहाटे उठून शाळेला यावे लागते. पण, बस उपलब्ध नसल्यामुळे ते सव्वाआठ वाजता शाळेत येतात. यामध्ये त्यांना सुरुवातीच्या दोन तासिका मिळत नाही व हजेरी सुद्धा जाते.बारावीला असणाऱ्या विद्यार्थ्यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान होत आहे.
– बसफेरी बारमाही असावी
नागपूर वरून बेला येथे सकाळी येणाऱ्या घाईगडबडीच्या प्रवाशांसाठी तसेच बेला येथून सिरसी उमरेड,भिशी व चिमुरकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी सकाळची ही बस फेरी सोईस्कर होती. ती परिवहन महामंडळाला फायदेशीर सुद्धा आहे.मात्र,त्यासाठी नियमित,सुरळीत व अखंड बारमाही सेवा असावी. दिवाळी व भाऊबीज हंगामात वर्दळ वाहतूक मोठी होती. तरीपण बस का बंद करण्यात आली. हेच मला समजत नाही.
ज्ञानेश्वर वरघने
बेला येथील शेतकरी व प्रवासी
– 6:45 ला बेला येथे बस पोहचावी
सकाळी सात वाजता शाळा भरते. मात्र नागपूर बेला उमरेड बस 7.15 वाजेनंतर बेला येथे पोहोचते. बेला बस स्थानक ते शाळा एक किलोमीटरचे अंतर आहे. त्यामुळे शाळेत पायदळी पोहोचायला 7.45 वाजते. तोपर्यंत एक तासिका चालली जाते. यामध्ये आमचे चार महिन्यापासून अभ्यासाचे नुकसान होत आहे. बस मध्ये लहरीपणा राहिल्यास बारावीत परसेंटेज कसे मिळेल. याचे आगर व्यवस्थापकांनी उत्तर द्यावे.
खुशी दहीहांडे (सोनेगाव)
हिमांशू घवघवी घवघवे (दहेली) बारावीचे विद्यार्थी
प्रतिक्रिया – दिवाळीच्या शाळेला सुट्ट्या होत्या.त्यामुळे नागपूर बेला उमरेड बस बंद करण्यात आली.दाभा येथे कृषी महोत्सव असल्यामुळे बसेस तिकडे वळत्या करण्यात आल्या आहे. चार-पाच दिवसानंतर बस सेवा सुरू करून देईल.
कोकीळा कटरे
उमरेड आगार व्यवस्थापक