– विद्यार्थ्यांशी साधला संवाद, वर्गखोल्यांची पाहणी
नागपूर :- महाराष्ट्र राज्याचे मा. शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी बुधवारी (५ फेब्रवारी ) नागपूर महानगरपालिकेच्या कळमना हिंदी उच्च प्राथमिक शाळा क्रमांक १ संजयनगर हिंदी माध्यमिक शाळेच्या प्रेमनगर शाखेला भेट दिली. त्यांच्या भेटीदरम्यान शाळेत विद्यार्थ्यांचा तास सुरु असताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक ज्ञानाची चाचपणी केली.
शालये शिक्षणमंत्री दादाजी भुसे बुधवारी (ता. ५) नागपूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी नागपूर महानगरपालिकेच्या कळमना हिंदी उच्च प्राथमिक शाळा क्रमांक १ संजयनगर हिंदी माध्यमिक शाळेच्या प्रेमनगर शाखेला आकस्मिक भेट दिली. त्यांनी वर्गात विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले, त्यांना वाचन, कविता गायन करायला देखील लावले. सुरुवातीला शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी इयत्ता तिसऱ्या वर्गात प्रवेश केला. येथील विद्यार्थ्यांना त्यांनी कविता म्हणायला लावली. इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांचे त्यांनी गणितीय ज्ञान तपासले.
वर्गातील विद्यार्थ्याला डिजिटल बोर्डवर वजाबाकी करायला लावली. काही विद्यार्थ्यांना वाचन करायला लावले. विद्यार्थ्यांची उत्तम प्रगती पाहुन प्रगतीवर शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी समाधान व्यक्त केले. याबद्दल त्यांनी स्वत: टाळ्या वाजवून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शिक्षण मंत्री महोदयांकडून मिळालेल्या या शाब्बासकीने विद्यार्थी आनंदीत झाले.
विद्यार्थ्यांच्या शारीरिक स्वच्छतेबाबत देखील दादाजी भुसे यांनी तपासणी केली. त्यांनी वर्गातील पटसंख्या आणि हजेरीबुकची सुद्धा तपासणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधला.
मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मिशन नवचेतना’ प्रकल्पांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या शाळांचा कायापालट केला जात आहे. या अंतर्गत महानगरपालिकेच्या कळमना हिंदी उच्च प्राथमिक शाळा क्रमांक १ संजयनगर हिंदी माध्यमिक शाळेच्या प्रेमनगर शाखेचा समावेश आहे. या शाळेमध्ये एकूण १८८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या भेटी प्रसंगी सहायक शिक्षणाधिकारी सुभाष उपासे, शाळेचे सहायक शिक्षक विजय वालदे, सहायक शिक्षिका सुनिता शेटे आणि माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकवर्ग उपस्थित होते.