नागपूर :-महानिर्मितीच्या जाहिरात क्र. ०९/२०२२ प्रमाणे अतिरिक्त कार्यकारी अभियंता पदाच्या १५४ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. ज्याची जाहिरात ०८/०९/२०२३ रोजी प्रकाशित करण्यात आली. या भरती प्रक्रियेमध्ये पहिल्यापासून गोंधळ आणि घोटाळे चालू असून कोणत्याही प्रक्रियेत पारदर्शकता नाही.
गोंधळ, घोटाळे खालीलप्रमाणे
१. वरील जाहिरातीप्रमाणे, २७/१२/२०२२ रोजी ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. ज्यामध्ये नकारात्मक गुणपद्धतीचा अवलंब करण्यात येणार नाही अशा स्पष्ट सूचना महानिर्मितीतर्फे परिपत्रक काढून देण्यात आल्या होत्या. परंतु परीक्षा सुरू होण्याआधी सर्वांना नकारात्मक गुण पद्धती अवलंबण्यात येईल असे संगणकावर प्रदर्शित करण्यात आले होते. नंतर काही ठिकाणी घोषणा करण्यात आली की नकारात्मक गुणपद्धती अवलंबण्यात येणार नाही, आणि इतर ठिकाणी काहीही सांगण्यात आले नाही. त्यामुळे परिक्षार्थींमध्ये गोंधळ उडाला. नंतर महानिर्मितीतर्फे सांगण्यात आले की नकारात्मक गुणपद्धतीचा अवलंब करण्यात येणार नाही.
यामुळे सर्वांना समान संधी देण्यात आली नाही अशी तक्रार परिक्षार्थींकडून करण्यात आली परंतु महानिर्मितीतर्फे त्यांना काहीही उत्तर मिळाले नाही म्हणून काही परिक्षर्थीनीं उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ येथे दाद मागितली आहे. (WP 2928/2023).
२. परीक्षा झाल्यानंतर कागदपत्रे पडताळणी करण्यात आली व नंतर पात्र व अपात्र उमेदवारांची यादी प्रकाशित करण्यात आली. परंतु पात्र उमेदवारांच्या यादीमध्ये काही उमेदवार नियमांप्रमाणे पात्र नसताना देखील केवळ एक मोठ्या राजकीय पक्षाच्या मंत्र्याने सांगितल्यामुळे पात्र ठरविण्यात आले. उदा. योग्य अनुभवाचा कालावधी पूर्ण केला नसलेले उमेदवार, योग्य शैक्षणिक अर्हता धारण केल्यानंतर त्या शैक्षणिक पात्रतेवर भरती झालेल्या पदाचा अनुभव नसलेले उमेदवार यांना पात्र ठरविण्यात आले.
शासन परिपत्रक क्र. एस आर व्ही-२००४/प्र.क्र.१०/०४/१२ दि.०३/०७/२००४ प्रमाणे अनुभवाचा कालावधीची गणना कशा प्रकारे करावी हे स्पष्ट आहे. परंतु प्रशिक्षण अभ्यागत असताना विद्यावेतन घेतलेला कालावधी सुद्धा अनुभव म्हणून गणना करून अपात्र उमेदवार पात्र ठरविण्यात आले.
३. तसेच अतिरिक्त कार्य. अभियंता या पदाच्या भरती करीता लागणाऱ्या योग्य शैक्षणिक अर्हता म्हणजेच अभियांत्रिकी पदवी नंतरचा पात्र पदाचा म्हणजेच सहाय्यक अभियंता आणि उप कार्यकारी अभियंता या पदाचाच अनुभव ग्राह्य धरणे योग्य असताना अभियांत्रिकी पदविका शैक्षणिक अर्हतेवर कनिष्ठ अभियंता या पदावर निवड झालेले पदवीधारक उमेदवारसुद्धा पात्र ठरविण्यात आले, जे सरासर नियमविरुद्ध आहे.
सोबत उमेदवारांनी दिलेल्या तक्रारी जोडल्या आहेत.
४. सोबत जोडलेल्या, महानिर्मिती प्रशासकीय परिपत्रक ५०२ दि.१७/०८/२०२२ आणि सूचना क्र.१०९५२ दि.२८/१०/२०२३ नुसार ऑनलाईन परीक्षेतील गुण यांना ७०% गुणांमध्ये रूपांतरित करून तसेच वैयक्तिक मुलाखतीतील गुण ३०% गुणांमध्ये रूपांतरित करून अंतिम निवड यादी तयार करण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. परंतु अंतिम गुणांची आकडेवारी करताना टक्केवारी न घेता ऑनलाइन परीक्षेच्या गुणांना ७० गुणांमध्ये आणि मुलाखतीच्या गुणांना ३० गुणांमध्ये परावर्तित करण्यात आले, ज्यामुळे ऑनलाइन परीक्षेचे गुण ४६.६७% गणल्या गेले आणि मुलाखतीचे गुण ६०% गणल्या गेले.
अंतिम गुण चुकीच्या पद्धतीमुळे गणल्यामुळे अनेक उमेदवार ऑनलाइन परीक्षेत चांगले गुण असून देखील निवड प्रक्रियेतून बाहेर पडल्या गेले. यामध्ये निवड न झालेल्या उमेदवारांचे मुलाखतीचे गुण सुद्धा प्रकाशित न करता लपवून ठेवल्या गेले. अंतिम यादी आणि गुण मिळाल्याची यादी सोबत जोडली आहे.