‘परक्लिक’ मध्ये कुशकुमार ठाकरे व मनिष पुथरण प्रथम
अमरावती :- महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे आयोजित महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा 2020 स्पर्धेत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या इन्क्युबेशन सेंटरच्या कुशकुमार ठाकरे व मनिष पुथरण या विद्याथ्र्यांच्या ‘परक्लिक’ या स्टार्टअपने राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे नाव उंचावले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा 2020 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या इन्क्युबेशन सेंटरचे विद्यार्थी कुशकुमार ठाकरे व मनिष पुथरण या विद्याथ्र्यांच्या ‘परक्लिक’ या स्टार्टअपने राज्यस्तरावर आरोग्य विभागातून प्रथम क्रमांक मिळविला. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार, दि. 16 ऑक्टोबर रोजी मुंबई येथील राजभवनात या महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा स्पर्धेतील विजेत्यांचा 1 लाख रुपये रोख व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी कौशल्य व नाविन्यता, उद्योजकता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा, प्रधान सचिव मनिषा वर्मा उपस्थित होते. महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा स्पर्धेत अमरावती विभागातून 7 विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली.
14 ऑक्टोबर रोजी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील इन्क्युबेशन सेंटरमध्ये जिल्हा स्तरावर आयोजित सादरीकरणातून या विद्याथ्र्यांची निवड करण्यात आली होती. यात जवळपास 200 विद्याथ्र्यांनी भाग घेतला. त्यातील कुशकुमार ठाकरे याने परक्लिक चे सादरीकरण केले होते. त्याच्या या स्टार्टअपची राज्यस्तरीय स्पर्धेकरीता निवड करण्यात आली होती. याकरीता कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे, प्र – कुलगुरू डॉ. व्ही. एस. चौबे, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. तसेच इन्क्युबेशन सेंटरच्या संचालक डॉ. स्वाती शेरेकर यांचे मौलिक सहकार्य व मार्गदर्शन लाभले. या सर्वत्र विद्याथ्र्यांचे अभिनंदन होत आहे.