नवी दिल्ली :- महाराष्ट्रासारखं मोठं राज्य हे या देशातील गुंडगिरीचा सगळ्यात मोठा अड्डा झालं आहे. राज्याचे मुख्यमंत्री गुंडाना पोसत आहेत. मुख्यमंत्र्यांना ‘वर्षा’वर गुंडाच्या टोळ्या येऊन भेटतात. वर्षावर, मंत्रालयात गुंडाच्या टोळ्यांच्या म्होरक्यांसोबत बैठका होतात, असे सांगत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. मुंबईचा माजी पोलिस अधिकारी हे सर्व घडवतोय, असा गंभीर आरोप त्यांनी केला. लोकसभा, विधानसभा निवडणूक आणि महापालिकेत देखील विरोधकांना संपवण्याचं षडयंत्र सुरू आहे, असा दावाही राऊत यांनी केला.
आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणानंतर गुंड आणि राजकीय नेत्यांच्या संबंधावर चर्चा होऊ लागली. त्यातच खासदार श्रीकांत शिंदे यांना पुण्यातील कुख्यात गुंड हेमंत दाभेकर याने श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर अजित पवार यांची पिंपरी चिंचवडमधील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या असिफ महंमद इक्बाल शेख उर्फ असिफ दाढी याने भेट घेतली. यावर संजय राऊत यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. त्यानंतर आज माध्यमांशी बोलताना राऊतांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर टीका केली.