– नामांकन मेळाव्यासाठी दिग्रस, दारव्हा, नेरमधील जनसागर उसळला
दारव्हा :- कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना जनतेचे प्रेम, सहकार्य आणि आशीर्वादाच्या बळावर माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता सलग चारवेळा आमदार झाला. आज पाचव्यांदा उमेदवारी दाखल करण्यासाठी उसळलेला जनसागर हीच आपली श्रीमंती आहे. येथे प्रत्येक माणसात मला देव भेटला. या सर्वांच्या साक्षीने शिवसेनेची उमेदवारी दाखल करताना विजयाचा विश्वास आहे, असे प्रतिपादन आमदार संजय राठोड यांनी केले.
दारव्हा येथे आज गुरूवारी नामांकन मेळाव्यात ते बोलत होते. दिग्रस, दारव्हा, नेर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (आ.), पिरिपा, लहुजी शक्ती सेना व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून संजय राठोड यांनी आज दुपारी दारव्हा उपविभागीय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष महादेव सुपारे, पीरिपा जिल्हाध्यक्ष सुरेश मेश्राम, माजी नगरसेवक आरीफ काजी, शिवसेना तालुका प्रमुख मनोज सिंगी आदी उपस्थित होते.
अर्ज दाखल करण्यापूर्वी आयोजित नामांकन मेळाव्यासाठी दिग्रस विधानसभा क्षेत्रातील २५ ते ३० हजार नागरिक उपस्थित होते. यावेळी संजय राठोड सामान्य रूग्णसेवक म्हणून सुरू केलेला प्रवास जनतेचे प्रेम व आशीर्वादामुळे सुरू आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना आपल्याला यश मिळाले. या यशाची शिल्पकार जनता आहे. आपण १०० टक्के समाजकारणच करतो. कोणाचीही जात, पात, धर्म बघून काम केले नाही. मी देव पाहिला नाही. परंतु, माणसात देव बघून सेवा करतो, असे यावेळी बोलताना संजय राठोड म्हणाले. गेल्या २० वर्षांत दिग्रस मतदारसंघात पायाभूत विकासावर भर दिला. तरीही सर्व कामे झाली असा दावा करता येणार नाही, असे ते म्हणाले. राहिलेले अनेक प्रकल्प, कामे भविष्यात पूर्ण करून दिग्रस, दारव्हा, नेर तालुक्याला राज्यातील सर्वांगीन विकसित तालुके करू, असे त्यांनी सांगितले. मंत्री म्हणून काम करताना घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती त्यांनी यावेळी दिली. जनतेसाठी आपण कधीच वेळ, काळ बघितला नाही. जनसेवेसाठी सदैव तत्पर असून, येथील जनता पुन्हा आपल्याला बहुमताने विजयी करेल, असा विश्वास यावेळी संजय राठोड यांनी व्यक्त केला.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष महादेवराव सुपारे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)चे प्रदेश सरचिटणीस वसंत घुईखेडकर, शिवसेना जिल्हाप्रमुख श्रीधर मोहोड, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश मेश्राम, जीवन पाटील, परमानंद अग्रवाल, कालिंदा पवार, अजय दुबे, नितीन देशमुख, नामदेव खोब्रागडे, जावेद जकुरा आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले. विरोधकांना संजय राठोड यांच्या विरोधात उभा करण्यासाठी उमेदवार मिळत नाही. आजच्या प्रचंड जनसमुदायाने संजय राठोड यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केले आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्क्याने संजय राठोड विजयी होतील, असा विश्वास यावेळी अनेक मान्यवरांनी व्यक्त केला. कार्यक्रमास शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख हरिहर लिंगनवार, पराग पिंगळे, बाळासाहेब दौलतकार, विशाल गणात्रा, वैशाली मासाळ, राजूदास जाधव, मोहन राठोड, विजय राठोड, सुभाष भोयर, प्रदीप झाडे, सुधीर देशमुख, जावेद पहेलवान, चितांगराव कदम, अर्चना इसाळकर, राजकुमार वानखडे, मनोज नाल्हे, प्रेम राठोड आदींसह शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, पीरिपा, रिपाई (आ.) व इतर मित्रपक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. मेळाव्यानंतर दारव्हा शहरातून रॅली काढून संजय राठोड यांनी उपविभागीय कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला.