
चंद्रपूर शहर महानगरपालिकेने स्वच्छ भारत अभियान १.० मध्ये मागील ५ ते ६ वर्षांपासून सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी केली आहे. यामध्ये स्वच्छता कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये चंद्रपूर पालिकेने odf++ तसेच gfc ३ स्टार व स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये देशातून ११ व क्रमांक व महाराष्ट्रातून दुसरा क्रमांक प्राप्त केलेला होता. याचाच पुढचा टप्पा म्हणजे स्वच्छ भारत अभियान २.० मध्ये प्रत्येक महिन्यात चांगली कामगिरी होण्याच्या दृष्टीने प्रत्यके झोनच्या स्वच्छता निरीक्षक व स्वच्छता कामगारांमध्ये चांगल्या कामाची स्पर्धा राबवून उत्कृष्ट झोनच्या कामगारांना सन्मानित करण्याचे स्वच्छ सर्वेक्षण २०२२ आढावा सभेत आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांनी वैद्यकीय अधिकारी स्वच्छता यांना निर्देश दिलेले होते.
त्यानुसार मागील दोन महिन्यांच्या कामाचा आढावा झोननिहाय स्वच्छता विभागाकडून घेण्यात आला. त्यामध्ये प्रामुख्याने नागरी घनकचरा नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई, प्लास्टिक बंदी अंमलबजावणी, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई तसेच रस्त्यावर दगड माती ठेऊन सार्वजनिक जागी अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई तसेच रस्त्यावर कचरा फेकणे इत्यादींबाबत कारवाई, कोविड नियमांचे उल्लंघन बाबत कारवाई, लसीकरण न झालेले कामगाराना लसीकरणासाठी प्रोत्साहित करणे व चंद्रपूर शहराला ९५ % लसीकरण करण्यात महत्वपर्ण योगदान या सर्व बाबींचा दोन महिन्यांचा आढावा घेण्यात आला. ६ झोनपैकी सर्वोत्तम काम करणारे झोन क्र. २ (ब) चे मुख्य स्वच्छता निरीक्षक विवेक पोतनुरवार यांना सर्वोत्तम स्वच्छता निरीक्षक हा पुरस्कार प्रदान करून सन्मानचिन्ह व शाल व टुरिस्ट बॅग देऊन सन्मानित करण्यात आले.
मान्यवरांच्या हस्ते प्रभाग शिपाई गटातील ६६ लोकांमधून धर्मपाल तागडे यांना उत्कृष्ट प्रभाग शिपाई म्हणून सन्मानित करण्यात आले. नालेसफाई गटातून भीमराव मेश्राम, रस्ते झडाई गटातून शोभा करमरकर, मुकेश महातव या चार सफाई कर्मचाऱ्याचा उल्लेखनीय कामगिरी बद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी सफाई कामगारांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना प्रमुख अतिथी अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल म्हणाले, आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता महत्वाची आहे. नागरिकांनीदेखील आपली जबाबदारी ओळखून स्वच्छतेला महत्व दिले पाहीजे. सफाई कर्मचाऱ्यांच्या या कामामुळे महानगपालिकेच्या प्रतिमेत सुधारणा होईल, अशी आशा व्यक्त केली.