मुंबई :- लेखक, संपादक, संघटक संदीप काळे यांचे ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ झाले आहे. लेखनाच्या माध्यमातून अनेक वर्ष, अनेक महत्त्वाचे सामाजिक प्रश्न संदीप काळे यांनी सोडवले आहेत. ते सामाजिक प्रश्न सुटलेच, शिवाय वंचित असणाऱ्या प्रत्येकाला मोठी आर्थिक मदत झाली. सलगता, सुटलेले प्रश्न, सामाजिक विषयांवर लेखन, प्रचंड प्रतिसाद, प्रभावशाली, सामाजिक, मोठ्या प्रमाणावर अनेकांना आर्थिक मदत, चिरंतन परिणामकारक असे संदीप काळे यांचे लेखन ठरले आहे. याची दखल घेऊन त्यांची ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’ने ‘वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद केली आहे. अमेरिका येथील एक मोठ्या इंग्रजी वर्तमानपत्राच्या संपादकांचे संदीप काळे यांनी रेकार्ड तोडले आहेत. ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’ या जागतिक पातळीवरील अनेक महत्त्वपूर्ण कामाची नोंद करणाऱ्या संस्थेने संदीप काळे यांना सन्मानपत्र, गोल्ड मेडल देऊन सन्मानित केले आहे. यापूर्वी महिलांच्या सामाजिक सीरिज, लेखनासाठी संदीप काळे यांची ‘गिनीज बुक’मध्ये नोंद झालीच होती. एक संवेदनशील लेखक, संपादक म्हणून संदीप काळे यांची सर्वत्र ओळख आहे.
संदीप काळे यांचा थक्क करणारा प्रवास
नांदेड जिल्ह्यातील ‘पाटनूर’ हे संदीप काळे यांचे गाव. रामराव वडील आणि आई मुक्ताबाई उर्फ कमलाबाई संदीप काळे यांचे वडील एक सर्वसामान्य शेतकरी. कुठलीही पार्श्वभूमी नसताना संदीप काळे यांनी अनेक क्षेत्रांत आपला इतिहास निर्माण केला आहे. निर्मल, मराठवाडा, अनुप, सृजन, कमल, राजन, ग्रंथाली, सकाळ अशा अनेक प्रकाशनांनी संदीप काळे यांची आजपर्यंत ६१ पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यांच्या ‘ऑल इज वेल’ आणि ‘ट्वेल्थ फेल’ या दोन पुस्तकांवर आता चित्रपट येऊ लागले आहेत. ‘व्हाईस ऑफ मीडिया’ या मूलभूत प्रश्नांवर लढणाऱ्या पत्रकारांच्या संघटनेच्या माध्यमातून संदीप काळे यांनी देशभर मोठे नेटवर्क उभे केले आहे. ‘व्हाईस ऑफ मीडिया’ या संघटनेत आज २३ राज्यांत २८ हजार पत्रकार काम करीत आहेत. अनेक टीव्ही, वर्तमानपत्र यांच्या माध्यमातून संदीप काळे यांनी केलेले शो, सतत लिहिलेले सदर नक्कीच सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारे होते. त्यांनी अनेक वर्तमानपत्रांत टीव्हीमध्ये संपादक म्हणून यशस्वीपणे भूमिका बजावली आहे. संदीप काळे आता मुंबईमध्ये एका मोठ्या वर्तमानपत्रात काम करतात. जगभर त्यांचे फिरणे सुरू असते. ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये नोंदीबाबत संदीप काळे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
फोटो ओळ;
संदीप काळे यांना ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’ या जागतिक पातळीवरील अनेक महत्त्वपूर्ण कामांची नोंद करणाऱ्या संस्थेने सन्मानपत्र, गोल्ड मेडल देऊन सन्मानित केले.