यवतमाळ :- महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीचे औचित्य साधत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातर्फे समता पंधरवाडयाचे आयोजन करण्यात आले आहे. पंधरवाड्यादरम्यान 11 वी 12 वी विज्ञान शाखेत प्रवेशित मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र देण्याची विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.
डॅा.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे पंधरवाड्याचा शुभारंभ झाला. यावेळी समितीच्या सदस्य तथा उपायुक्त प्राजक्ता इंगळे, समाजकल्याणच्या सहाय्यक आयुक्त मंगला मून, जिल्हा समाजकल्याण अधिकारी पियूष चव्हाण यांच्यासह सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
समता पंधरवाडा मोहिम दि. 1 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या मोहिमे दरम्यान विज्ञान शाखेतील प्रवेशित सर्व मागासवर्गीय विदयार्थ्यांची जात पडताळणी प्रकरणे तालुका व महाविद्यालय निहाय संख्यात्मक माहिती, समान संधी केंद्राच्या माध्यमातून महाविद्यालय तसेच जिल्हा स्तरावर संकलित करण्यात येणार आहे.
समता पंधरवाड्यात सीईटी देणारे विद्यार्थी, डिप्लोमाच्या तृतीय वर्षातील प्रवेशित विद्यार्थी, व्यवसायीक प्रवेशाकरीता अर्ज करणारे विद्यार्थी तसेच 11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणीच्या पार्श्वभूमिवर संबंधित महाविद्यालयातील समान संधी केंद्रामार्फत वेबिनारचे आयोजन करण्यात येणार आहे.
समान संधी केंद्राच्या माध्यमातून सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अर्ज जमा करण्यात येणार असून प्राप्त अर्जावर तत्काळ कार्यवाही करून जात वैधता प्रमाणपत्र देण्याचे नियोजन जात पडताळणी समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील विज्ञान शाखेतील प्रवेशित विद्यार्थी, सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आप-आपल्या महाविद्यालयात परीपुर्ण अर्ज सादर करून जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे व या मोहिमेचा लाभ घ्यावा असे अवाहन समितीचे अध्यक्ष तथा निवडश्रेणी अतिरिक्त जिल्हाधिकारी सोनाप्पा यमगर, उपायुक्त तथा समितीच्या सदस्य प्राजक्ता इंगळे तसेच संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव पीयूष चव्हाण यांनी केले आहे.