राज्यात काही भागात पसरली ( मीझल्स ) गोवराची साथ, मनपा आरोग्यविभागा तर्फे लसीकरणाचे आवाहन 

 

नागपूर :- राज्यात काही भागात गोवरची साथ पसरत असल्याने, महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे शहरातील नागरिकांना कुटुंबातील लहान मुलांना गोवर प्रतिबंधीत लसीकरण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गोवर हा प्रामुख्याने लहान मुलामध्ये आढळणारा संसर्गजन्य आजार आहे. ताप, सर्दी, डोळे लाल होणे, खोकला अशी सुरूवातीची लक्षणे असतात. त्यानंतर पुरळ उठायला सुरवात होते, ती कपाळा पासून व नंतर मान व हातपाय पर्यंत पसरते. गोवर हा गंभीर आजार आहे कारण हा इतर आजारांना निमंत्रण देतो. लहान मुलांना खोकल्याचा त्रास सुरु होतो व त्यामुळे घशाला सूज येते निमोनिया होऊ शकतो. गोवर झाल्यानंतर अ जीवनसत्व कमी होते त्यामुळे डोळ्याचे आजार होतात काही वेळा अंधत्व पण येते. कुपोषित बालकास हा आजार होण्याची जास्त शक्यता असते .

गोवर झाल्यास बालकाला इतरांपासून वेगळे ठेवले पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी जाऊ देऊ नये, किंवा शाळेत पाठवू नये. कारण हा आजार अतिशय संसर्गजन्य आहे. ताबडतोब डॉक्टरांचा सल्ल्या घ्यावा , घरच्या घरी उपचार करू नये, कडू निंबाचा पाला किंवा इतर कोणतेही घरगुती उपचारात वेळ घालवू नये. सर्व डॉक्टरांनी गोवर सदृश लक्षणे असणाऱ्या सर्व बालकाची माहिती महानरपालिका आरोग्य विभागास देणे आवश्यक आहे. गोवरावर नेमका उपचार उपलब्ध नाही परंतु रुग्नास आवश्यकतेप्रमाणे उपचार करण्यात येतात तसेच लसीकरणामुळे या आजारावर प्रतिबंध करता येतो. एम एम आर किंवा एम आर ची लस खासगी व सरकारी दवाख्यानात उपलब्ध आहे ही वयाच्या ९ व्या महिन्यात व त्यानंतर १८ ते २४ महिने वयात देता येते. परंतु काही कारणामुळे आपण आपल्या बाळाला हि लस दिली नसल्यास किंवा काही डोस सुटले असल्यास ताबडतोब देण्यात यावी. यामुळे आपल्या बाळाचं गोवर आजारापासून संरक्षण होईल ही लस सर्व सरकारी दवाखान्यात मोफत उपलब्ध आहे अशी माहिती डॉ. गोवर्धन नवखरे, साथरोग अधिकारी मनपा नागपूर यांनी दिली आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com