– भदंत सुरेई ससाई यांच्या उपस्थितीत बुद्ध वंदना
– इंदोरा बुद्ध विहार, संविधान चौक, विमानतळ येथे बाबासाहेबांचा जयघोष
– भीम गीताचे सामूहिक गायन
Nagpur :- महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी, आणि अ. भा. धम्मसेना यांच्या संयुक्त वतिने भदंत ससाई यांच्या उपस्थितीत दीक्षाभूमी येथे बुद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली. उपस्थित अनुयायांनी बाबासाहेबांच्या अस्थिला वंदन केले. यावेळी भिक्खु संघ तसेच उपासक- उपासिकांनी सामुहिक भीम गीत गायले. याप्रसंगी भदंत ससाई यांनी मार्गदर्शन केले. डॉ. बाबासाहेब यांनी दिलेला सामाजिक न्याय, समता, बंधुता, व धर्मनिरपेक्षतेचा संदेश आजही मार्गदर्शक आहे. बाबासाहेब हे केवळ नाव नसून प्रेरणा आहे. सामाजिक समतेसाठी त्यांनी लढा दिला, असे ससाई म्हणाले. प्रज्ञा, शील, करुणा, विद्या, मैत्री या पंचतत्वावर प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चरित्र बनवले पाहिजे, असा संदेशही ससाई यांनी दिला.
याप्रसंगी दीक्षाभूमी स्मारक समितीचे एन. आर. सुटे, आनंद फुलझेले, विलास गजघाटे, डॉ. सुधीर फुलझेले, डॉ. चंद्रशेखर मेश्राम, डॉ. प्रदीप आगलावे, प्राचार्या दीपा पान्हेकर, प्राध्यापक, प्राध्यापिका, कर्मचारी तसेच भंते नागसेन, भंते प्रज्ञा बोधी, भंते अश्वघोष, भंते संघ, भंते बुध्दघोष, भंते नागवंश, भिक्खुनी संघप्रिया, शीलानंद, विशाखा यांच्यासह उपासक- उपासिका, धम्मसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते. तत्पूर्वी भदंत ससाई यांनी इंदोरा बुद्ध विहार, इंदोरा चौक, संविधान चौक आणि विमानतळ येथील डॉ. बाबासाहेबांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी बाबासाहेबांचा जयघोष करण्यात आला. चारही स्थळी भीम गीतांचे सामुहिक गायन करण्यात आले.