– मराठीमध्ये कृष्णात खोत यांच्या ‘रिंगाण’ कादंबरीला तर कोकणी लेखक प्रकाश पर्येकर यांच्या ‘वर्सल’ या कथासंग्रहाला पुरस्कार
– नवी दिल्लीतील कमानी सभागृह येथे 12 मार्च 2024 रोजी पुरस्कार वितरण सोहळा
नवी दिल्ली :- साहित्य अकादमीने 24 भाषांमधील वार्षिक साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा केली आहे. 2023 सालचे साहित्य अकादमी पुरस्कार 9 कविता संग्रह, 6 कादंबऱ्या, 5 लघुकथा, 3 निबंध आणि 1 साहित्यिक अभ्यासाला मिळाले आहेत.
24 भारतीय भाषांमधील प्रतिष्ठित परीक्षक सदस्यांनी शिफारस केलेल्या पुरस्कारांना साहित्य अकादमीच्या कार्यकारी मंडळाने 20 डिसेंबर 2023 रोजी साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजुरी दिली.
मराठी भाषेतील कादंबरीसाठी कृष्णात खोत यांच्या ‘रिंगाण’ या कादंबरीला तर कोंकणी भाषेतील लघुकथेसाठी प्रकाश एस. पर्येकर यांच्या ‘वर्सल’ या कथासंग्रहाला पुरस्कार मिळाला आहे.
पुस्तकांची निवड संबंधित भाषांमधील तीन सदस्यांच्या परीक्षकांनी केलेल्या शिफारशींच्या आधारे करण्यात आली होती. कार्यपद्धतीनुसार, कार्यकारी मंडळाने परीक्षकांनी एकमताने केलेली निवड किंवा बहुमताच्या आधारावर केलेल्या निवडीच्या आधारे पुरस्कार घोषित केले. पुरस्काराच्या आधीच्या पाच वर्षांत (म्हणजे 1 जानेवारी 2017 ते 31 डिसेंबर 2021 दरम्यान) प्रथम प्रकाशित झालेल्या पुस्तकांशी संबंधित हे पुरस्कार आहेत.
प्रत्येकी 1,00,000/- रुपये रोख, ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप असून 12 मार्च 2024 रोजी कमानी सभागृह, कोपर्निकस मार्ग, नवी दिल्ली- 110 001 येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात पुरस्कार विजेत्यांना हे पुरस्कार प्रदान केले जातील.