Ø तीन महिन्यांकरिता राज्य शासनकडून 540 कोटींची तरतूद
Ø योजनेचा मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे दूध उत्पादकांना आवाहन
नागपूर :- सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना गायीच्या दुधासाठी प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. अनुदानाची ही योजना दिनांक १ जुलै ते ३० सप्टेबर २०२४ पर्यंत कार्यरत राहणार, यासाठी ५४० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
दूध उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन नागपूर विभागाचे प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी एस.एल.नवले यांनी केले आहे.
सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांमार्फत संकलित होणाऱ्या गायीच्या दुधाकरिता अनुदानासाठी ३.५ फॅट तसेच ८.५ एसएनएफ या गुणप्रतीचे दूध आवश्यक आहे. तसेच किमान ३० रुपये प्रतिलिटर इतका दर संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने जमा करणे बंधंनकारक राहणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी बँकेमार्फत विशेष सॉफ्टवेयर प्रकल्पांना उपलब्ध करुन देण्यात आले असून यापूर्वी योजनेत सहभागी असलेल्या प्रकल्पांना दिलेला लॉग-ईन आयडी व पासवर्ड कायम ठेवण्यात आला आहे. त्यानुसार दूध उत्पादकांनी आपल्या दुभत्या जनावरांची माहिती प्रकल्पामार्फत पोर्टलवर भरावयाची आहे. या योजनेच्या अधिक माहिती साठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हा दूग्धव्यवसाय विकास अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी अथवा प्रदेशिक दुग्धव्यवसाय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आहवानही एस.एल.नवले यांनी केले आहे.