छतावरील सौर ऊर्जा निर्मिती : यशस्वी कामगिरीमुळे राज्याला केंद्र सरकारकडून २६० कोटी रुपये 

नागपूर :- घरांच्या छतावर सौर ऊर्जानिर्मिती पॅनेल्स बसवून वीजनिर्मिती करण्याच्या योजनेत उत्तम कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्याला गेल्या चार वर्षात केंद्र सरकारकडून २६० कोटी ९१ लाख रुपये प्रोत्साहनपर रक्कम मिळाली आहे, असे महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सांगितले.

छतावर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविणाऱ्या ग्राहकांना केंद्र सरकारकडून अनुदान मिळते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे यासाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली आहे. या योजनेत वीज ग्राहकांना थेट लाभ होत असल्याने योजनेची प्राधान्याने अंमलबजावणी करण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणला केली आहे. छतावरील सौर ऊर्जानिर्मितीच्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्यासाठी महावितरणला जबाबदारी देण्यात आली आहे.

छतावरील सौर ऊर्जा निर्मितीच्या बाबतीत किती घरांवर प्रकल्प बसविले व त्यातून त्यांची वीजनिर्मिती क्षमता किती झाली याबाबतीत केंद्र सरकारकडून प्रत्येक राज्याच्या कामगिरीचे मूल्यमापन केले जाते. आधीच्या वर्षापेक्षा चालू वर्षात किती जास्त कामगिरी झाली यानुसार केंद्र सरकार त्या त्या वीज वितरण कंपनीला यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रोत्साहनपर रक्कम मंजूर करते.

महाराष्ट्र राज्याला छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प बसविण्यातील कामगिरीबद्दल केंद्र सरकारकडून २०१९ – २० व २०२० -२१ या दोन आर्थिक वर्षात अनुक्रमे ५९ व ३७ कोटी रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्यात आली. २०२१ -२२ या आर्थिक वर्षात राज्याची कामगिरी उंचावल्यामुळे केंद्र सरकारकडून ६९ कोटी ४७ लाख रुपये प्रोत्साहनपर रक्कम मंजूर झाली. २०२२ – २३ या आर्थिक वर्षासाठी ९४ कोटी ९१ लाख रुपये मंजूर झाले. २०२३ – २४ या आर्थिक वर्षात आधीच्या वर्षापेक्षा अधिक चांगली कामगिरी झाल्यामुळे केंद्र सरकारच्या निकषानुसार १३७ कोटी रुपये प्रोत्साहनपर रक्कम मिळणे अपेक्षित आहे.

राज्यामध्ये आतापर्यंत २,३७,६५६ वीज ग्राहकांनी छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविले असून त्यांची एकूण क्षमता २७३८ मेगावॅट आहे. यामध्ये प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या ८१,९३८ ग्राहकांचा व त्यांच्या एकूण ३२३ मेगावॅट क्षमतेचा समावेश आहे. या ग्राहकांना ६४७ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे.

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत घरावर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविणाऱ्या घरगुती ग्राहकांना केंद्र सरकारकडून थेट अनुदान मिळते. एक किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पासाठी ३० हजार रुपये, दोन किलोवॅट क्षमतेसाठी ६० हजार रुपये आणि तीन किलोवॅट क्षमतेसाठी ७८ हजार रुपये अनुदान मिळते. महावितरणने या योजनेत घरगुती वीज वापरासाठी सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसविणाऱ्या ग्राहकांना मोफत नेट मिटर देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी https://www.pmsuryaghar.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करता येते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

स्मृतीशेष मधुकरराव तामगाडगे चॅरिटेबल ट्रस्टमार्फत शैक्षणिक शिष्यवृत्ती वितरण सोहळा

Mon Dec 30 , 2024
नागपूर :- दि. 29 डिसेंबर 2024 ला स्मृतीशेष मधुकरराव तामगाडगे चॅरिटेबल ट्रस्ट जयवंत नगर नागपूर येथील मुख्यालयामध्ये शैक्षणिक शिष्यवृत्ती वितरणाचा सोहळा पार पडला. स्त्री-पुरुष असमानतेला तडा देण्यासाठी. मुलींना शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन त्यांना शिक्षणासाठी प्रेरित करून, त्या शिक्षण घेत असताना त्यांच्या शिक्षणामध्ये कुठलाही सामाजिक किंवा आर्थिक अडथळा यायला नको यासाठी तामगाडगे परिवार नेहमीच प्रयत्नशील असतो. याच प्रयत्नाचे स्वरूप म्हणजे तामगाडगे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!