– आ.संजय देरकर यांच्याहस्ते उद्घाटन
– प्रदर्शनास 500 पशुपक्ष्यांचा समावेश
यवतमाळ :- झरी पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाच्यावतीने तालुकास्तरीय पशु, पक्षी प्रदर्शन व पशु मेळाव्याचे आयोजन झरी येथे करण्यात आले होते. प्रदर्शनीचे उद्घाटन आ.संजय देरकर यांच्याहस्ते आले. प्रदर्शनात शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. यात 500 पेक्षा अधिक पशुपक्षी सहभागी झाले होते.
उद्घाटनप्रसंगी आ.संजय देरकर यांच्यासह कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.विजय रहाटे तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार वामनराव कासावार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. क्रांती काटोले, गट विकास अधिकारी रवींद्र कुमार सांगळे उपस्थित होते. प्रदर्शनाचे आयोजन पशुधन विकास अधिकारी डॉ. निलेश राठोड यांनी केले.
सुरुवातीस क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला हार अर्पण तसेच दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रदर्शनामध्ये 500 हून अधिक पशु पक्षी सहभागी झाले होते. त्यात संकरीत वासरे, देशी गायवर्ग, संकरीत गायवर्ग, सुदृढ बैलजोडी, म्हैसवर्ग, शेळी वर्ग, कुक्कुट वर्ग या प्रमाणे आठ गटात पशु पक्षांचा सहभाग होता.
सहभागी पशु पक्ष्यांपैकी उत्कृष्ट पशु पक्षांना आ.देरकर यांच्याहस्ते मधून 2 लाख 18 हजार 300 रुपयांची 80 पारितोषिके देण्यात आली. पशु, पक्षी यांच्यासाठी टेंट, चारा आदींची तर पशुपालकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. क्रांती काटोले यांनी केले. प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी पशुसंवर्धन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.