-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून विज्ञान आठवड्यात सुरुवात
नागपूर :- मानवी समाजाच्या गरजा भागविण्यासाठी संशोधन होणे महत्त्वपूर्ण आहे. मात्र निसर्ग, जैवविविधतेला नुकसान होऊ न देता समाजाच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीने संशोधन व्हावे, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी केले. ‘जगाच्या कल्याणासाठी जागतिक विज्ञान’ या थिमवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने २७ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान विज्ञान आठवडा साजरा केला जात आहे. डॉ. सी.व्ही. रमण यांच्या सन्मानार्थ २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. याचे औचित्य साधून विद्यापीठाच्या गणित विभागातील रामानुजन ऑडिटोरियम येथे विज्ञान आठवड्याचे उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. चौधरी मार्गदर्शन करीत होते.
उद्घाटनिय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी होते. प्रमुख अतिथी म्हणून नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. राजेश सिंह, आयक्यूएसी संचालक डॉ. स्मिता आचार्य, समन्वयक डॉ. उमेश पालीकुंडवार, सहसमन्वयक डॉ. विजय तांगडे आदी मंचावर उपस्थित होते.
देशाचा विकास अर्थात जीडीपी तेथील उत्पादित होणाऱ्या उत्पादनांवर निर्धारित आहे. देश विकासाच्या दृष्टीने नवनवीन उत्पादने होणे गरजेचे आहे. मात्र,स्वस्त व सहज असले तरी जैवविविधतेला नुकसान पोहोचविणारे संशोधन स्विकाहार्य नाही. मानवी विकासासाठी शाश्वत उत्पादन तयार करणारे संशोधन व्हावे याकडे नवसंशोधकांनी लक्ष द्यावे लागेल, असे कुलगुरू डॉ. चौधरी पुढे बोलताना म्हणाले. जागतिक स्तरावरचे संशोधन सुरुवातीला आपणाकडून होणार नाही. त्यामुळे स्थानिक स्तरावर समाजाच्या गरजा ओळखून सुरुवातीला त्या दृष्टीने संशोधन करावे. नंतर स्थानिक ते जागतिक पातळीवर अपेक्षित असलेले संशोधन करणे शक्य होईल. विद्यापीठ शताब्दी वर्ष साजरे करत आहे. या शताब्दी वर्षांमध्ये विद्यापीठाचे संपूर्ण नेटवर्क वापरून नवनवीन संशोधनातून आपण शाश्वत मानवी विकासाला चालना देण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे कुलगुरू म्हणाले.
समाजपयोगी होत असलेले संशोधन विद्यापीठाकडून मंजूर केली जाईल. यापूर्वी आपण विविध संशोधनास फेलोशिप, निधी देतो.. त्यातून संशोधन होत असली तरी त्याचा समाजाला काहीच उपयोग होत नव्हता. पर्यायाने तो पैसा वाया जात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे समाजपयोगी संशोधन व्हावे म्हणून धोरणामध्ये बदल करण्यात आला आहे. तज्ञांची मते घेऊन संशोधनाबाबत नवीन धोरण तयार केल्याचे कुलगुरू म्हणाले. प्रत्येक विद्यार्थी -शिक्षकाने रिसर्च पेपर प्रसिद्ध केलाच पाहिजे. त्यामुळे संशोधनाचा स्तर वाढेल. शिवाय उत्कृष्ट संशोधन होण्यास मदत होईल. संशोधनात स्थानिकांचा सहभाग घेतल्यास त्याची उपयोगिता वाढेल असे कुलगुरू म्हणाले.
आयआयएल संचालक डॉ. राजेश सिंह यांनी मार्गदर्शन करताना विद्यापीठातील अनेक शिक्षकांचे जगमान्य असलेल्या जर्नलमध्ये रिसर्च पेपर प्रसिद्ध होत असल्याचे सांगितले. देशात देखील रिसर्च पेपर प्रसिद्ध होण्याची संख्या अधिक आहे. मात्र, जागतिक पातळीवर स्थान मिळेल असे संशोधन होत नसल्याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. पर्यावरण, नैसर्गिक ऊर्जा, पाणी प्रदूषण अशा अनेक समाजपयोगी बाबींमध्ये संशोधनाची नितांत आवश्यकता आहे. आपल्या तुलनेत विदेशात अधिकाधिक पेटंट घेतले जात आहे. चीन देखील संशोधनाच्या बाबतीत पुढे गेला आहे. शिक्षकांनी याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. कोणतेही संशोधन वाया जात नाही. त्याचा वापर कोठे करावा हे आपणावर अवलंबून आहे. सोबतच काही मंडळांचे गठन अद्याप शिल्लक आहे. मात्र संशोधनावर याचा परिणाम होणार नसल्याचे डॉ. राजेश सिंह म्हणाले. विद्यापीठ गीताने कार्यक्रम सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक डॉ. उमेश पलीकुंडवार यांनी केले. यावेळी आयक्यूएसी संचालक डॉ. स्मिता आचार्य यांनी देखील मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन शिखा गुप्ता यांनी केले तर आभार सहसमन्वयक डॉ. विजय तांगडे यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
संशोधक शिक्षकांचा सन्मान
विविध क्षेत्रात संशोधन करणाऱ्या विद्यापीठातील शिक्षकांचा या कार्यक्रमात प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात डॉ. प्रमोद खेडेकर, डॉ. प्रशांत गाडे, डॉ. संजय ढोबळे, डॉ. कीर्तीकुमार रणदिवे, डॉ. दादासाहेब कोपरे, डॉ. निशिकांत राऊत, डॉ. प्रकाश इटनकर, डॉ. रवी जुनादे, डॉ. वंदना सामंत, डॉ. रिता वडेट्टीवार, डॉ. विजय तांगडे, डॉ. राजेश उगले, डॉ. अभय वर्हाडी, डॉ. अभय देशमुख, डॉ. सत्येंद्र प्रसाद, डॉ. पायल ठावरे, डॉ. स्मिता आचार्य यांचा सन्मान करण्यात आला.