नागपूर :- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यक्रमाला नागरिकांनी गर्दी केली. खामला चौकातील ना. गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात हे आयोजन करण्यात आले. यावेळी दिव्यांग, निराधार, ज्येष्ठ नागरिक आदींनी विविध प्रकारच्या मदतीसाठी गर्दी केली होती.
खामला येथील जनसंपर्क कार्यालयात नागरिकांनी निवेदनांसह सकाळपासूनच मोठी गर्दी केली. मोठ्या संख्येने महिला व पुरुष कार्यालयात उपस्थित होते. यामध्ये दिव्यांगांचाही समावेश होता. काही दिव्यांगांनी नोकरीसाठी तर काहींनी कृत्रीम हात व पायांच्या मागणीसाठी निवेदन दिले.नवीन रस्त्यांसाठी, अनुकंपा तत्वावरील नोकऱ्यांसाठी, आरोग्य क्षेत्रातील मागण्यांसाठी नागरिकांनी निवेदने दिली.
यावेळी ना. गडकरी यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. व्यक्तिगत पातळीवरील प्रश्नांसह संस्था-संघटना, शहराच्या व खेड्यापाड्यांमधील विषयांवर नागरिकांनी ना. गडकरी यांच्यासोबत चर्चा केली. विविध मागण्यांची निवेदने स्वीकारून मंत्री महोदयांनी संबंधित विभागांकडे या संदर्भात पाठपुरावा करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. यासोबतच रेल्वे, महामार्ग, कृषी, सहकार, पर्यावरण, पाणीपुरवठा, ऑटोमोबाईल अशा विविध क्षेत्र व विभागांशी संबंधित विषय ना. गडकरी यांनी ऐकून घेतले. काही तरुणांनी नाविन्यपूर्ण प्रयोगांचे प्रेझेंटेशन ना. श्री. गडकरींना दिले. तर विविध क्रीडा प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचेही ना. गडकरी यांनी कौतुक केले.