नागपूर :- मुंबईचे लोकवाङमय गृह प्रकाशन, शिवाजी सायंस कॉलेज आणि जनसंवाद विभाग, धनवटे नॅशनल कॉलेज (डीएनसी) यांच्या संयुक्त विद्यमाने मिलिंद कीर्ती लिखित ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचे मायाजाल युग’ या द्विखंडी ग्रंथाचा पहिला खंड असलेल्या ‘तंत्रज्ञानाची प्रबळ सत्ता’ या पुस्तकाचे प्रकाशन शनिवार २५ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजता डीएनसीच्या मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृह, काँग्रेसनगर येथे आयोजित करण्यात आले आहे.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात राहणार आहेत. यावेळी प्रमुख अतिथी आयआयएम, नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मेत्री, निरीचे संचालक डॉ. अतुल वैद्य, श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ, मराठी समीक्षक डॉ. अशोक नामदेव पळवेकर आणि स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रा. दिलीप चव्हाण उपस्थित राहणार आहेत.
‘तंत्रज्ञानाची प्रबळ सत्ता’ या ग्रंथात मिलिंद कीर्ती यांनी मनुष्याचा जन्म ते इच्छा मरण देणार्या तंत्रज्ञानाच्या विकासाचा आढावा घेतला आहे. माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान अर्थव्यवस्थेच्या विकासाचे प्रभावी माध्यम आहे. आगामी काळात कृत्रिम बुद्धिमत्ताधिष्ठित समाजाची निर्मिती होणार आहे. त्यामध्ये समाजातील बहुसंख्य व्यक्ती कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर विसंबून राहतील, असेही या पुस्तकात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकाशन सोहळ्याला तंत्रज्ञानप्रेमी, अभ्यासक, प्राध्यापक, वकील, डॉक्टर, पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवाजी सायंस कॉलेजचे प्राचार्य डॉ. महेंद्र ढोरे व धनवटे नॅशनल कॉलेजच्या प्राचार्या डॉ. भारती खापेकर यांनी केले आहे.